
देवगड : देवगड-निपाणी राज्य मार्ग क्रमांक १७८ वरील देवगड शहर ते जामसंडे या टप्प्यात सुरू असलेल्या सिमेंट काँक्रिट रस्त्याच्या कामाच्या दर्जाबाबत गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत.
या कामात निकृष्ट दर्जा आणि तांत्रिक त्रुटी असल्याचा आक्षेप घेत देवगड-जामसंडे नगरपंचायतीचे स्वीकृत नगरसेवक सुधीर लवू तांबे यांनी महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाच्या (एमएसआयडीसी) व्यवस्थापकीय संचालकांकडे लेखी निवेदनाद्वारे तक्रार केली आहे. या संपूर्ण कामाची वरिष्ठ व स्वतंत्र तांत्रिक अधिकाऱ्यांच्या पथकामार्फत तपासणी करून दोषी ठेकेदार आणि संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
देवगड-निपाणी राज्य मार्ग क्रमांक १७८ च्या काँक्रिटीकरण व दुपदरीकरणाचे काम सध्या सुरू आहे. या प्रकल्पांतर्गत देवगड शहर ते जामसंडे या टप्प्यात सुरू असलेल्या कामाच्या गुणवत्तेबाबत गंभीर त्रुटी निदर्शनास येत असल्याचे तांबे यांनी निवेदनात म्हटले आहे. काँक्रिट तयार करताना आवश्यक दर्जा व प्रमाण पाळले जात आहे की नाही, मंजूर मिक्स डिझाइननुसार काम होत आहे का आणि काँक्रिटच्या मजबुतीची प्रयोगशाळेतून योग्य तपासणी केली जात आहे का, याबाबत त्यांनी शंका उपस्थित केली आहे.
रस्त्याच्या पायासाठी वापरण्यात येणारी खडी व इतर साहित्याची गुणवत्ता, पाया आणि सब-बेसची आवश्यक जाडी, तसेच योग्य पद्धतीने रोलरद्वारे कॉम्पॅक्शन केले जात आहे की नाही, याची प्रत्यक्ष तपासणी करण्याची मागणी करण्यात आली आहे. मंजूर तांत्रिक आराखड्यानुसार सर्व थरांचे काम झाले आहे का, याचीही खातरजमा करावी, असे त्यांनी नमूद केले आहे.
काँक्रिट टाकल्यानंतर योग्य प्रमाणात आणि नियमित पाणी मारून क्युरिंग केले जाते का, नियमानुसार आवश्यक कालावधीपर्यंत क्युरिंग केले जाते का, तसेच क्युरिंग रजिस्टर व साइटवरील दैनंदिन नोंदी तपासाव्यात, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे.
या कामाच्या गुणवत्तेबाबत ठेकेदाराच्या नियंत्रणाखालील तपासणीवर अवलंबून न राहता स्वतंत्र दक्षता व गुणवत्ता नियंत्रण विभागामार्फत तपासणी करण्यात यावी, अशी ठाम भूमिका तांबे यांनी मांडली आहे. देवगड शहर ते जामसंडे या संपूर्ण टप्प्याची वरिष्ठ व स्वतंत्र तांत्रिक अधिकाऱ्यांच्या पथकामार्फत तातडीने पाहणी करावी. काँक्रिटचे नमुने घेऊन अधिकृत प्रयोगशाळेत क्यूब टेस्ट आणि आवश्यकतेनुसार कोअर टेस्ट करावी. रस्त्याचा पाया, खडी, सब-बेस, कॉम्पॅक्शन आणि काँक्रिटची जाडी यांची प्रत्यक्ष तपासणी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
याशिवाय कामाचे मंजूर अंदाजपत्रक, तांत्रिक मान्यता, मिक्स डिझाइन, गुणवत्ता तपासणी अहवाल, क्यूब टेस्ट रिपोर्ट आणि मोजमाप पुस्तिका (Measurement Book) यांचीही तपासणी करण्याची मागणी करण्यात आली आहे. तपासणीदरम्यान कामात त्रुटी आढळल्यास संबंधित काम तात्पुरते थांबवून आवश्यक ती दुरुस्ती करण्याचे आदेश द्यावेत. निकृष्ट कामासाठी जबाबदार ठेकेदार, अभियंते आणि संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करून नियमानुसार कारवाई करावी. तसेच दोषपूर्ण कामाची बिले अदा करण्यापूर्वी गुणवत्ता तपासणीचे अहवाल पडताळावेत, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
या तक्रारीवर झालेल्या कार्यवाहीचा सविस्तर लेखी अहवाल आणि प्रयोगशाळेतील तपासणीचे निष्कर्ष उपलब्ध करून द्यावेत, तसेच भविष्यात रस्त्याच्या कामाचा दर्जा टिकून राहण्यासाठी नियमित तपासणी व देखरेख व्यवस्था लागू करावी, असेही निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.
देवगड व जामसंडे परिसरातील नागरिक, शालेय विद्यार्थी, रुग्णवाहिका तसेच सर्वसामान्य वाहनचालकांसाठी हा रस्ता अत्यंत महत्त्वाचा आहे. रस्त्याचे काम निकृष्ट झाल्यास नागरिकांच्या जीवितासह मालमत्तेलाही धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे या तक्रारीची गांभीर्याने दखल घेऊन स्वतंत्र गुणवत्ता तपासणी करावी आणि योग्य ती कायदेशीर व प्रशासकीय कारवाई करावी, अशी मागणी नगरसेवक सुधीर लवू तांबे यांनी केली आहे.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all








