
पालघर : पालघर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ४ नोव्हेंबरच्या संध्याकाळी नायगाव स्थानकावर एका ५३ वर्षीय व्यक्तीने लोकल ट्रेनमध्ये २० वर्षीय तरुणीची छेड काढली आणि त्यानंतर तिला धावत्या ट्रेनमधून बाहेर ढकलून दिल्याची घटना घडली आहे. या घटनेत तरुणीचा डावा हात कोपराच्या खालून कापला गेला. (Naigaon Local Train Incident)
या घटनेनंतर भाईंदर लोहमार्ग पोलिसांनी तपास सुरू केला. सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर पोलिसांनी बुधवारी जितेंद्र हिरमुखे या संशयित आरोपीला अटक केली. जीआरपीच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, संशयित आरोपीने आपला चेहरा कापडाने झाकल्यामुळे सुरुवातीला त्याची ओळख पटवणे कठीण होते. तरीही, पोलीस पथकाने त्याला नायगाव येथील त्याच्या राहत्या घरातून पकडले असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू केली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, संशयित आरोपी जितेंद्र हिरमुखे हा नायगाव पूर्व येथील वाकीपाडा परिसराचा रहिवासी आहे. तो कर्करोगाचा रुग्ण असून तो अपंगांसाठी राखीव असलेल्या डब्यातून प्रवास करत होता. संध्याकाळच्या गर्दीच्या वेळी, तो चुकून बोरीवलीहून विरारच्या दिशेने जाणाऱ्या 'फास्ट' लोकल ट्रेनमध्ये चढला होता.
पोलिसांच्या म्हणण्यानुसार, प्रवासादरम्यान आरोपीने परिस्थितीचा फायदा घेत तरुणीला अयोग्य पद्धतीने स्पर्श करण्यास सुरुवात केली. तिने विरोध केल्यावर त्यांच्यात जोरदार वाद झाला. हा वाद ट्रेन नायगाव स्थानकापर्यंत पोहोचेपर्यंत सुरूच होता.
ट्रेन नायगाव स्थानकावर थांबली असताना आरोपीने तरुणीला ट्रेनबाहेर ढकलले. ती ट्रेन आणि प्लॅटफॉर्मच्या मधल्या फटीत पडली. ती उठण्याचा प्रयत्न करत असतानाच ट्रेन सुरू झाली. यामुळे तिला गंभीर दुखापत झाली आणि तिचा डावा हात कोपराच्या खालून कापला गेला.
रुग्णालयात डॉक्टरांनी तरुणीची तपासणी केल्यानंतर तिचा डावा हात कोपराच्या खालून कापावा लागला. पोलिसांनी या प्रकरणाचा अधिकृत तपास सुरू केला असून आरोपीविरुद्ध छेडछाड करणे आणि तरुणीला मुद्दाम बाहेर ढकलणे यांसारख्या कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all








