LIVE UPDATES

राजकारण बाजूला ठेवून बळीराजाला दिलासा देणे गरजेचे

भाजप तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांचे आवाहन
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: October 02, 2026 17:21 PM
views 35  views

मालवण : १९७२ नंतरचा सर्वात भीषण दुष्काळ सध्या जाणवत असून पावसाचे प्रमाण अत्यंत कमी राहिल्याने जिल्ह्यात आतापासूनच पाण्याची गंभीर टंचाई निर्माण झाली आहे. या बिकट परिस्थितीत राजकारण बाजूला ठेवून सर्वांनी एकत्र येत बळीराजाला दिलासा देणे गरजेचे आहे. भाजपचे सर्व वरिष्ठ नेते आणि प्रशासकीय यंत्रणा शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी असून, महसूल व कृषी अधिकाऱ्यांनी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन सरसकट नुकसानीचे पंचनामे करावेत, असे थेट आवाहन भाजप तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांनी पत्रकार परिषदेत केले.

भाजप तालुका कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत धोंडी चिंदरकर बोलत होते. यावेळी प्रभारी शहराध्यक्ष पंकज सादये, महेश मांजरेकर, नगरसेवक ललित चव्हाण, शिल्पा खोत, पंचायत समिती सदस्या योजना कांबळी, अमृता फाटक, रश्मी लुडबे, संतोषी कांदळकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

श्री. चिंदरकर म्हणाले की, भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांच्या, मुख्यमंत्र्यांच्या आणि पालकमंत्र्यांच्या सूचनांनुसार आम्ही गेल्या दोन दिवसांपासून विविध भागांत प्रत्यक्ष पाहणी करत आहोत. वरून शेती हिरवी दिसत असली तरी प्रत्यक्षात उत्पन्नात मोठी घट झाली आहे. त्यामुळे प्रशासनाने संवेदनशील राहून शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे. अधिकारी वर्ग सध्या चांगले काम करत आहे, मात्र कुठल्याही अधिकाऱ्याचा चुकारपणा सहन केला जाणार नाही.

विरोधकांवर टीका करताना ते म्हणाले, "माजी आमदार वैभव नाईक यांनी सध्याच्या गंभीर परिस्थितीत राजकारण थांबवून पालकमंत्र्यांच्या खांद्याला खांदा लावून काम केले पाहिजे. येत्या काळात ग्रामपंचायत व इतर निवडणुका येतीलच, मात्र ही वेळ पक्षांतराचे किंवा राजकीय शेरेबाजीचे राजकारण करण्याची नाही. सर्व लोकप्रतिनिधींनी एकत्र येऊन जनतेचे आणि शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवले पाहिजेत."

जिल्ह्यात निर्माण झालेल्या भीषण पाणीटंचाईवर मात करण्यासाठी खासदार नारायण राणे आणि पालकमंत्री नितेश राणे यांनी पाणी साठवणुकीसाठी जास्तीत जास्त कच्चे बंधारे बांधण्याचे आवाहन केले आहे. या आवाहनाला प्रतिसाद देत मालवण तालुक्यात ठिकठिकाणी पाणी अडवण्यासाठी तात्काळ कच्चे बंधारे बांधण्यास सुरुवात करण्यात येत आहे. या कामात भाजपचे सर्व कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी आणि नागरिक पूर्ण ताकदीने उतरतील आणि प्रशासनाला सर्वतोपरी सहकार्य करतील, अशी ग्वाही चिंदरकर यांनी दिली.

पत्रकार बांधवांनीही या संकट काळात प्रशासकीय यंत्रणा व लोकप्रतिनिधी यांच्यासोबत राहून बंधारे बांधण्याच्या व पाणी साठवण्याच्या चळवळीत सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी शेवटी केले.