"खऱ्या सूत्रधाराला अटक करा"

संतप्त ग्रामस्थांचा पोलीस ठाण्यावर धडक मोर्चा
Edited by: उमेश बुचडे
Published on: March 27, 2026 20:46 PM
views 182  views

कणकवली : बांधकाम व्यावसायिक सुशांत दळवी यांच्या हत्येमुळे कणकवली तालुक्यात खळबळ माजली असतानाच आता या प्रकरणाच्या तपासावरून ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. "चोर सोडून संन्यासाला फाशी देऊ नका," असा इशारा देत माजी आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली कळसुली ग्रामस्थांनी आज पोलीस ठाण्यावर धडक दिली.

सुशांत दळवी खून प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत तिघांना ताब्यात घेतले आहे. प्राथमिक माहितीनुसार, दळवी यांचा मुकादम अमर कदम याने हा खून केल्याचे समोर येत आहे. मात्र, ग्रामस्थांच्या मते अमर कदम हा एकटा हे कृत्य करू शकत नाही. यामागे मोठे षडयंत्र असण्याची शक्यता असून, खऱ्या गुन्हेगारांना वाचवण्यासाठी कोणा निष्पाप व्यक्तीला गोवू नये, अशी भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. माजी आमदार वैभव नाईक यांच्यासह ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाने पोलीस निरीक्षक तेजस नलवडे यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. यावेळी अमर कदमचे अन्य साथीदार कोण आहेत, याचा कसून शोध घ्यावा. केवळ संशयावरून कारवाई न करता, हत्येमागील मुख्य कारणापर्यंत पोहोचावे, दोषी सुटणार नाहीत आणि निरपराध अडकणार नाहीत याची दक्षता घेऊन कठोर कारवाई करावी आदी मागण्या करण्यात आल्या.  यावेळी जिल्हा परिषद सदस्य शितल दळवी, माजी सदस्या सुगंधा दळवी, माजी सरपंच अतुल दळवी, नंदू परब, सुदेश वारंग, रवी दळवी, सुशील सावंत, प्रणिक शेटे, अनुप वारंग, पपू यादव यांच्यासह कळसुली गावातील ग्रामस्थ आणि सुशांत दळवी यांचा मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता.