
वैभववाडी : तालुक्यात दुसऱ्या दिवशीही अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावत जनजीवन विस्कळीत केले. वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी नुकसान झाले असून शेतकरी व बागायतदार चिंतेत सापडले आहेत.
शिराळे येथे वादळी पावसाचा विशेष फटका बसला. जोरदार वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे सुमारे पाच घरांचे नुकसान झाले असल्याची प्राथमिक माहिती आहे. काही ठिकाणी पत्र्यांची छपरे उडून गेली तर झाडे कोसळल्याच्या घटनाही घडल्या.
दरम्यान, सह्याद्री पट्ट्यातील गावांसह मांगवली, हेत आणि भुईबावडा परिसरातही पावसाने दमदार हजेरी लावली. या अवकाळी पावसामुळे आंबा आणि काजू बागायतदारांचे मोठे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
हवामानातील या अचानक बदलामुळे हंगामावर परिणाम होण्याची शक्यता असून, बागायतदारांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रशासनाने नुकसानीचा पंचनामा करून मदतीची मागणी करण्यात येत आहे.











