
कुडाळ : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने कुडाळ न्यायालयात आत्मसमपर्ण केलेला खंडणी प्रकरणातील फरारी संशयित वकील किशोर वरक याला कुडाळ न्यायालयाने न्यायालयीन कोठडी दिली होती. आज त्याला कुडाळ न्यायालयात हजर करण्यात आले. कुडाळ पोलिसांनी याला आपल्या ताब्यात देण्याबाबत बाजू मांडली. न्यायालयाने देखील संशयित किशोर वरक याला कुडाळ पोलिसांच्या ताब्यात देण्याचे आदेश पारित केले. पण रात्रीच्या वेळी ताब्यात देण्याची कार्यवाही होत नसल्याने संशयित किशोर वरक याची पुन्हा सावंतवाडी कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. कुडाळ पोलीस उद्या त्याला अटक करून न्यायालयाकडे त्याच्या पोलीस कोठडीची मागणी करणार आहेत, अशी माहिती कुडाळ पोलीस ठाण्यातून देण्यात आली.
या बाबत दि. २ फेब्रुवारी रोजी कुडाळ पोलिसांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नमूद केले होते की, सिद्धीविनायक ऊर्फ प्रकाश बिडवलकर याच्या खून प्रकरणातील संशयित आरोपी सिद्धेश अशोक शिरसाट यास व त्याचे साथीदार यांना अटक करण्यात आलेली होती. त्या गुन्हयात सिद्धेश शिरसाठ यास मोक्का लावुन त्याचा जामीन होवु देणार नाही या करीता वकील किशोर सिदु वरक (रा. खानोली, ता. वेंगुर्ला) याने सिद्धेश शिरसाट याची पत्नी सिद्धी सिद्धेश शिरसाठ यांचेकडे त्याचा साथीदार सुरेश दुर्गा झोरे, (रा. गिरगांव, ता. कुडाळ) याचे मार्फत दहा लाख रुपये खंडणीची मागणी करुन एक लाख रुपये सिद्धेश शिरसाट याचे मित्र योगेश ऊर्फ बंटी तुळसकर व हार्दीक शिगले यांचेकडून कुडाळ एमआयडीसी परीसरात दि. ०३.०७.२०२५ रोजी घेतले. त्याबाबत सौ. सिद्धी शिरसाट यांनी दिले तक्रारीवरुन वकील किशोर सिदु वरक व सुरेश दुर्गा झोरे यांचेवर कुडाळ पोलीस ठाण्यात दि. १४.११.२०२५ रोजी गुन्हा दाखल आहे. त्या गुन्हयात कुडाळ पोलीसांनी आरोपी सुरेश दुर्गा झोरे यास अटक करुन न्यायालयात हजर केले होते. गुन्हयातील मुख्य सुत्रधार संशयित आरोपी वकील किशोर वरक हा गुन्हा दाखल झाल्यापासुन फरारी होता.
या मुदतीत त्याने जिल्हा व सत्र न्यायालय, सिंधुदुर्ग यांचे न्यायालयात अटकपूर्व जामीन मिळणेकरीता अर्ज केलेला होता. तो अर्ज जिल्हा व सत्र न्यायालयाने फेटाळून लावलेला होता. त्यानंतर त्याने जिल्हा व सत्र न्यायालयाचे निर्णयाविरुद्ध उच्च न्यायालय, कोल्हापूर यांचे न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज केलेला होता. उच्च न्यायालयाने संशयित आरोपी किशोर वरक हाच मुख्य सुत्रधार असल्याचे मत नोंदवुन आरोपीचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता. त्यानंतर फरारी संशयित आरोपी वकील किशोर वरक याने उच्च न्यायालयाचे आदेशाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात अटकपूर्व जामीन मिळणेकरीता अर्ज सादर केलेला होता. त्या अर्जाची २ फेब्रुवारी रोजी सर्वोच्च न्यायालय, दिल्ली या ठिकाणी सुनावणी होवुन सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामीन अर्जाबाबतचा आदेश कायम ठेवुन संशयित आरोपी किशोर वरक याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला तसेच आरोपीत यास १५ दिवसात आत्मसमर्पण करण्याबाबत आदेशीत केलेले होते.
१५ दिवसात आत्मसमर्पण करण्याबाबत आदेश न्यायालयाने दिल्यानंतर किशोर वरक हा आदेशाच्या दहाव्या दिवशीच म्हणजे बुधवारी कुडाळ न्यायालयात हजर होत त्याने आत्मसमर्पण केले. यावेळी किशोर वरक यांच्या बाजूने ॲड. असीम सरोदे यांनी युक्तिवाद केला. त्यांचा युक्तिवाद पूर्ण झाल्यावर न्यायालयाने पोलिसांना बाजू मांडण्यासाठी सांगितले. या बाबत पोलिसांनी आज त्यांची बाजू मांडली. संशयित किशोर वरक याला ताब्यात देण्याची मागणी केली. त्यावरून न्यायालयाने त्याला ताब्यात देण्याचे आदेश पारित केले. पण रात्रीच्या वेळी ताब्यात देण्याची कार्यवाही होत नसल्याने संशयित किशोर वरक याची पुन्हा सावंतवाडी कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. कुडाळ पोलीस उद्या त्याला अटक करून न्यायालयाकडे त्याच्या पोलीस कोठडीची मागणी करणार आहेत, अशी माहिती कुडाळ पोलीस ठाण्यातून देण्यात आली.













