LIVE UPDATES

विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांची विशाल परब यांनी घेतली सदिच्छा भेट

Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: November 24, 2026 07:44 PM
views 67  views

सावंतवाडी : त्रिपुरारी पौर्णिमेच्या निमित्ताने महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडीतील आपल्या निवासस्थानी आले असता भाजप युवा नेते विशाल परब यांनी त्यांची सदिच्छा भेट घेतली.

या भेटीदरम्यान विशाल परब यांनी ॲड. राहुल नार्वेकर यांना छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा भेट देऊन त्यांचे स्वागत केले. तसेच, त्यांना शुभेच्छा दिल्या.सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाच्या विकासाच्या दृष्टीने ही भेट महत्त्वपूर्ण ठरली. मतदारसंघाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी मी विशाल परब यांच्या सोबत आहे असे उद्गार ॲड‌ नार्वेकर यांनी काढले.

यावेळी दोघांमध्ये राजकीय, सामाजिक विषयांवर आदी विषयांवर चर्चा झाली. याप्रसंगी भाजपचे युवा नेते विशाल परब, दिलीप भालेकर, केतन आजगावकर, ओंकार पावसकर, साईप्रसाद भोई, धीरेंद्र म्हापसेकर, प्रशांत पाटील यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

विशाल परब यांनी ॲड. राहुल नार्वेकर यांची सावंतवाडी येथे सदिच्छा भेट घेत त्यांनी कोकणच्या विकासासाठी विशेष कृती आराखडा तयार करून त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याची आग्रही विनंती केली. सिंधुदुर्ग जिल्ह्यासह संपूर्ण कोकण विभागाच्या विकासासाठी आरोग्य, शैक्षणिक, औद्योगिक आणि कृषी क्षेत्रात नियोजनबद्ध पावले उचलण्याची आवश्यकता असल्याचे विशाल परब यांनी यावेळी अधोरेखित केले.

कोकणातील नैसर्गिक संपत्ती, पर्यटन क्षमता, कृषी उत्पादन आणि स्थानिक मनुष्यबळ यांचा योग्य समन्वय साधून विकासाच्या नव्या संधी निर्माण करता येतील. त्यासाठी शासनाच्या माध्यमातून विशेष निधी, योजना आणि दीर्घकालीन विकास आराखडा तयार करून त्याची अंमलबजावणी व्हावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

विशाल परब यांनी मांडलेल्या विकासात्मक मागणीची ॲड. राहुल नार्वेकर यांनी सकारात्मक दखल घेतली. सिंधुदुर्ग जिल्ह्यासह संपूर्ण कोकणच्या विकासासाठी शासनाच्या माध्यमातून विशेष प्रयत्न केले जातील. आगामी काळात कोकणच्या गरजा आणि विकासाच्या संधी लक्षात घेऊन विशेष ॲक्शन प्लॅन तयार करून त्याच्या अंमलबजावणीसाठी आपण निश्चितच प्रयत्नशील राहू, असा सकारात्मक प्रतिसाद त्यांनी दिला.

पालकमंत्री नितेश राणे यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली तळकोकणाच्या विकासासाठी आपण कटिबद्ध असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले. कोकणच्या विकासासाठी सकारात्मक भूमिका घेतल्याबद्दल विशाल परब यांनी ॲड. राहुल नार्वेकर यांचे आभार मानले तसेच त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.