
सावंतवाडी : कोकणच्या लाल मातीत, डोंगरदऱ्यांच्या कुशीत वसलेलं एक छोटंसं गाव पण त्याची आध्यात्मिक उंची इतकी मोठी की त्याला थेट 'दक्षिण कोकणाचं प्रतिपंढरपूर' म्हटले जाते. सावंतवाडीपासून अवघ्या १३ किलोमीटर अंतरावर असलेल्या सोनुर्लीचं श्री देवी माऊली मंदिर. पण... पंढरपूर हे विठुरायाचं क्षेत्र, मग देवी माऊलीच्या या स्थानाला 'प्रति पंढरपूर' का म्हणतात? लोटांगणाचा हा सोहळा इतका वेगळा का आहे ? आणि या मंदिराच्या मागे दडलेला प्राचीन इतिहास काय सांगतो ? चला जाणून घेऊया.
सोनुर्लीची श्री देवी माऊली म्हणजेच 'महिषासुर मर्दिनी'! हातात तलवार, ढाल आणि त्रिशूळ धारण केलेले तिचे रूप अत्यंत तेजस्वी आणि आकर्षक आहे. ही मूर्ती खडकात कोरलेली असून तब्बल ३०० वर्षांहून अधिक जुनी मानली जाते. सिंधुदुर्गात भरणाऱ्या 'तीन पोत्यांच्या मेळ्यां'पैकी सोनुर्लीचा हा मेळा एक महत्त्वाचा भाग आहे. जसे पंढरपुरात जातीपातीच्या पलीकडे जाऊन लाखो भाविक विठुरायाच्या दर्शनासाठी एकवटतात, तसेच सोनुर्लीच्या माऊलीच्या चरणी श्रद्धा, समरसता आणि नवसाची भावना घेऊन लाखो भक्त नतमस्तक होतात.
नवसाला पावणारी देवी म्हणून तिचा महिमा सातासमुद्रापार पोहोचला आहे. या जत्रोत्सवाचा सर्वात विलक्षण आणि अंगावर काटा आणणारा क्षण म्हणजे रात्री ११ वाजण्याच्या सुमारास होणारी सुमारे ७ ते ८ हजार लोटांगणे. प्रथम पुरुषांची आणि त्यानंतर महिलांची लोटांगणे होतात. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हा सर्वात मोठा लोटांगण जत्रोत्सव आहे.
विशेष म्हणजे, इतक्या प्रचंड गर्दीतही हा सोहळा अत्यंत शांततामय आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडतो. मनोकामना पूर्ण झालेले भक्त लोटांगण घालतात आणि जत्रोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी तुळाभार विधी करून आपला नवस फेडतात.
संकलन - स्वप्निल परब
मुख्य उपसंपादक, दै. कोकणसाद
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all








