कणकवलीत उड्डाणपुलाखाली चोरीला गेलेली जनरेटरची वायर सापडली

चोरट्याला ग्रामस्थांचा चोप
Edited by: उमेश बुचडे
Published on: February 10, 2026 19:38 PM
views 15  views

कणकवली : कणकवली येथील सह्याद्री हॉटेल समोरून ब्रिजखाली लावलेली जनरेटरची २५ स्क्वेअर एमएम जाडीची, सुमारे १०० मीटर लांबीची नवीन वायर गेल्या चार दिवसांपूर्वी चोरीला गेली होती.

या घटनेनंतर सोशल मीडियावर चोरीबाबत पोस्ट व्हायरल झाली होती. वेदा जनरेटरचे विनू महाडिक यांनी ही पोस्ट करत, चोराला पकडून देणाऱ्यास योग्य बक्षीस दिले जाईल, असे जाहीर केले होते.कणकवली शहरात जनरेटरच्या जाड तांब्याच्या वायर परप्रांतीय भंगारवाल्याकडे आढळली आहे. त्यानंतर चोरट्यास ग्रामस्थांनी यथेच्छ चोप दिला. ही चोरी सीसीटीव्हीच्या मदतीने उघडकीस आणण्यात आली.

या चोरीबाबत सोमवारी शहरातील एका दुकानदाराच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यातून चोरीचा धागा मिळाला. यानंतर शहरातील भंगार आणि पुठ्ठा व्यवसाय करणाऱ्या ठिकाणी शोधमोहीम राबवण्यात आली. या तपासादरम्यान उत्तर प्रदेशातील एका व्यक्तीकडे ही चोरीची वायर आढळून आली. तांब्याची तार वेगळी काढून ती विक्रीसाठी घरामध्ये लपवून ठेवण्यात आली होती. सुरुवातीला संबंधित व्यक्तीने चोरीची कबुली दिली नाही.मात्र ग्रामस्थांकडून ‘प्रसाद’ मिळाल्यानंतर, अखेर त्याने चोरीची कबुली दिली. त्याच्याकडील तांब्याची तार ताब्यात घेत त्याला यथेच्छ चोप ग्रामस्थांनी दिला.

कणकवली शहरात अशा पध्दतीने चोरी करणा-या परप्रांतीय व्यक्तिंवर पोलीसांनी कारवाई करावी , अशी मागणी करण्यात आली. रात्रीच्या वेळी पोलीसांनी गस्त वाढवावी. तसेच जे परप्रांतीय व्यावसायिक आले आहेत त्यांची नोंदणी करुन त्यांची पार्श्वभूमी तपासावी अशी मागणी होत आहे.