LIVE UPDATES

Crime news : आंबोलीत गोवा बनावटीच्या दारू वाहतूकीवर कारवाई

10 लाखांचा मुद्देमाल जप्त : दोघा आरोपींना अटक तर तिघे फरार
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: September 28, 2026 18:41 PM
views 26  views
Sawantwadi Police seize Goa-made liquor and Bolero pickup during Amboli operation

सावंतवाडी‌ : गोवा बनावटीच्या दारूची बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्यांवर सावंतवाडी पोलीस ठाण्याच्या पथकाने आंबोली पोलीस चेकपोस्टजवळ मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत दोन आरोपींना अटक करण्यात आली असून एकूण १० लाख ७ हजार ६०० रुपये किमतीचा मुद्देमाल आणि महिंद्रा बोलेरो पिकअप गाडी जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणातील तीन आरोपी फरार झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, आज २८ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी २:०० वाजण्याच्या सुमारास बांदा ते संकेश्वर जाणार्‍या रस्त्यावर, आंबोली पोलीस चेकपोस्टपासून सुमारे ४० मीटर अंतरावर आजऱ्याच्या दिशेला (आंबोली बाजारवाडी) पोलिसांनी सापळा रचला होता. आरोपींनी आपापसात संगनमत करून महिंद्रा कंपनीची बोलेरो मॅक्स पिकअप (क्रमांक MH 13 DQ 5089) या वाहनातून कोणतीही परवानगी नसताना २,०६,६०० रुपये किमतीच्या गोवा बनावटीच्या दारूची बिगरपरवाना वाहतूक चालवली होती. या कारवाई दरम्यान बोलेरो गाडी सुरक्षितपणे पुढे जावी म्हणून आरोपी क्रमांक ३ ते ५ हे टोयोटा रुमियन कार (क्रमांक MH 13 FC 0991) मधून पायलट (पथरक्षण) करत पुढे चालले होते.

पोलिसांनी त्यांना थांबण्याचा इशारा केला असता, त्यांनी इशारा न जुमानता कारसह तिथून पळ काढला. या कारवाईत नितीन संजय धनवडे (वय २७) आणि सचिन विजय वाकडे (वय २५, दोघेही रा. मंगळवेढा, धरणगाव रोड बायपास, दामाजी नगर, ता. मंगळवेढा, जि. सोलापूर) या दोन आरोपींना घटनास्थळावरून ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे.

कारवाईदरम्यान २ लाख ०६ हजार ६०० रुपये किमतीची गोवा बनावटीची दारू आणि वाहतुकीसाठी वापरलेली बोलेरो मॅक्स गाडी असा एकूण १० लाख ०७ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. फरार आरोपी ३ ते ५ यांचा शोध सुरु आहे. या प्रकरणी सावंतवाडी पोलीस ठाणे अंतर्गत दूरक्षेत्र आंबोलीचे पोलीस नाईक गौरव गोविंद परब (वय ३६) यांनी फिर्याद दिली आहे. आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम १९४९ चे कलम ६५(अ), ६५, ८३, ८१ आणि मोटर वाहन अधिनियम १९८८ चे कलम १७९ (१) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार मनीष शिंदे, पोलीस हवालदार रामदास जाधव आणि पोलीस नाईक गौरव परब यांनी केली. या गुन्ह्याचा पुढील तपास सावंतवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार शिंदे करत आहेत.