
सावंतवाडी : जिल्ह्यातील सावंतवाडी, दोडामार्ग आणि वेंगुर्ला या तीन तालुक्यांमध्ये परप्रांतीय व्यक्तींनी मोठ्या प्रमाणावर जमिनी खरेदी केली असून दिल्ली, पंजाब, हरियाणा आणि नोएडा यांसारख्या भागातील व्यक्तींनी येथे जमिनी खरेदी केल्याचे दिसून येत आहे.
या संपूर्ण जमीन व्यवहाराबाबत जिल्हाधिकारी यांची भेट घेणार असल्याची माहिती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष ॲड. अनिल केसरकर यांनी दिली. आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
श्री. केसरकर म्हणाले, विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी जमीन व्यवहाराचा मुद्दा उपस्थित केला होता. तर राज्याचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी तात्काळ 'विशेष तपास पथक' स्थापन करण्याची घोषणा केली होती. त्यानुसार विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल यांच्या नेतृत्वाखाली एसआयटीची स्थापना करण्यात आली.
सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीचे जिल्हाधिकारी यात सदस्य म्हणून समाविष्ट आहेत. अग्रवाल यांनी यापूर्वी दोनदा चौकशी देखील केली आहे. मात्र, ही चौकशी खरोखरच पारदर्शकपणे सुरू आहे का ? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. १-२ गुंठ्याचे राजस्थानचे शेतकरी दाखले वापरून खरेदीखते करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला.
यात शेतकऱ्यांची फसवणूक झाली असून कायदेशीर प्रक्रियेतील भरमसाठ स्टॅम्प ड्युटीमुळे शेतकरी न्यायासाठी न्यायालयातही जाऊ शकत नाहीत. या सर्व पार्श्वभूमीवर नक्की कसली चौकशी झाली ? यात कोणकोणते लोक सहभागी आहेत, चौकशी कुठपर्यंत आली ? याची माहिती घेण्यासाठी मनसेचे शिष्टमंडळ येत्या दोन दिवसांत सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेणार असल्याचे जिल्हाध्यक्ष ॲड. केसरकर यांनी सांगितले.
तसेच या विषयाबाबत आमचे वरिष्ठ नेते कोकणात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी तालुकाध्यक्ष मिलींद सावंत, शहराध्यक्ष ॲड. राजू कासकर, विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष केतन सावंत, सतिश आकेरकर, अतुल केसरकर आदी उपस्थित होते.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all










