LIVE UPDATES

ग्रामपंचायत हद्दीतच अवैध गावठी दारूची विक्री

अनेक कुटुंबे उद्ध्वस्त
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: June 16, 2026 13:22 PM
views 37  views

  • पोलिसांच्या तडीपार नोटिसला केराची टोपली ?

रायगड :  धाटाव ग्रामपंचायत हद्दीत गेल्या १५ वर्षांहून अधिक काळ कथितपणे अवैध गावठी दारूची विक्री सुरू असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. या व्यवसायामुळे अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली असून तरुणाईही व्यसनाच्या विळख्यात अडकत असल्याची गंभीर बाब समोर येत आहे.

स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, संबंधित यंत्रणांकडून वेळोवेळी कारवाई व नोटिसा देण्यात आल्याच्या चर्चा होत असल्या तरी प्रत्यक्षात अवैध धंद्यांवर प्रभावी नियंत्रण येताना दिसत नाही. त्यामुळे कायद्याची भीती उरली आहे का, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

दारूच्या सहज उपलब्धतेमुळे अनेक कुटुंबांमध्ये आर्थिक व सामाजिक समस्या वाढत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. व्यसनाधीनतेमुळे कौटुंबिक वाद, आरोग्याच्या समस्या आणि तरुण पिढीचे नुकसान होत असल्याबद्दल पालकांमध्ये कमालीची चिंता व्यक्त केली जात आहे.

महत्वाची बाब म्हणजे संबंधित अवैध दारू विक्रेत्यांना वारंवार नोटीस तसेंच हद्दपार सारख्या नोटीसा देऊन सुद्धा प्रशासनाचा भय राहिला आहे की नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे.

विशेष म्हणजे, धाटाव ग्रामपंचायतीने स्वच्छता अभियानात विविध स्तरांवर नावलौकिक मिळवला असतानाच गावातील अवैध दारू व्यवसायाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. एकीकडे स्वच्छ व आदर्श गावाची प्रतिमा उभी राहत असताना दुसरीकडे व्यसनमुक्ती आणि सामाजिक आरोग्याच्या दृष्टीने ठोस उपाययोजना करण्याची गरज व्यक्त होत आहे.

या पार्श्वभूमीवर संबंधित प्रशासन, पोलीस विभाग व ग्रामपंचायत यांनी संयुक्तपणे कारवाई करून अवैध दारू विक्रीला आळा घालावा, तसेच व्यसनमुक्तीबाबत जनजागृती मोहीम राबवावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. पुणे येथे नुकत्याच झालेल्या कांड लक्षात घेता संबंधित पोलीस यंत्रणा या वर नेहमी काय ठोस भूमिका घेते..? की चार दिवसांनी पुन्हा परिस्थिती जैसे थे अशीच राहते का हे देखील पहावे लागणार.