
• एखादा प्रकल्प नागपूरला घेऊन जावा : डॉ. जयेंद्र परुळेकर
सावंतवाडी : 'बड्या बड्या बाता अन् सामान्यांना लाथा' अशी परिस्थिती सावंतवाडीत झाली आहे. नगराध्यक्षांवर राजघराण्यातील लखम सावंत यांना टक्केवारीचे आरोप होत आहेत. पुण्यश्लोक बापुसाहेब महाराजांचा वारसा या संस्थानला असून इतर ठिकाणी समस्या असताना सावंतवाडीत सुराज्य आणणारे ते राजे होते. आज इनकमिंच्या नावाखाली संस्थानचे नाव खराब होत असून राजघराण्याने भान विसरू नये असा टोला माजी नगरसेवक डॉ. जयेंद्र परुळेकर यांनी हाणला. तसेच आजगावात ग्रामसभेच्या ठराव धुडकावून ड्रोन सर्वेक्षण करणाऱ्यांना अटक का झाली नाही ? पर्यावरण हितासाठी बोलताना आम्हाला काळी मांजर म्हटलं गेलं तर आम्ही 'ब्लॅक कॅट' कमांडो आहोत. पर्यावरणास हानी करणारे प्रकल्प कोकणात का ? एखादा नागपूरला घेऊन जा असाही टोला हाणला. आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
डॉ. परूळेकर म्हणाले, आता राजेशाही शिल्लक नसल्याने कुणाला राजे बोलणार नाही. मात्र, सावंतवाडीच्या राजघराण्याचा गौरव देशाने केला आहे. पुण्यश्लोक बापुसाहेब महाराजांचा वारसा या संस्थानला आहे. जेव्हा दिवाबत्ती वर जग चालायचं तेव्हा इथे लाईट होती, मातीचे रस्ते असताना चांगले तेव्हा रस्ते होते, रुग्णालय नसताना रुग्णालय होती. याच सर्व श्रेय पुण्यश्लोक बापुसाहेब महाराजांना असून याचा विसर आताच्या पिढीला पडला आहे का ? आज गॅस पाईपलाईनच्या कामात कुठे रिक्षा अडकते, माणस पडतात. हा विकास हप्तेखोरीसाठी आहे का ? असा सवाल माजी नगरसेवक डॉ. जयेंद्र परुळेकर यांनी केला.
तर आज टेंडरसाठी मुजरा करायला राजवाड्यात जाव लागत असून मायकल डिसोजा म्हणत आहेत ते चुकीचं नाही असं म्हणायची वेळ आली आहे. त्यांचे मोती तलावाच्या सुशोभीकरणासाठी प्रयत्न चालू असून त्या नावाखाली टक्केवारी खाऊन विद्रुपीकरण केलं जाईल. जी सावंतवाडी नैसर्गिकरीत्याच सुशोभित आहे ती तुम्ही काय सुशोभित करणार ? यात तलावातील काही भाग बुजवण्याचा तर डाव नाही ना ? अर्धीअधीक सावंतवाडी या काठावर असते. तर फुटपाथच काम देखील निकृष्ट आहे. तुम्ही नगरपरिषदेचे विश्वस्त आहात, सावंतवाडीही सर्वात जुनी नगरपरिषद असून पालकमंत्री यांनी सांगितलेली मोठी रेघ भ्रष्टाचाराची ओढायची का ? असा सवाल त्यांनी केला. तसेच राजघराण्याबाबत आम्हाला नितांत आदर असून त्याला पुण्यश्लोक बापुसाहेब महाराज, शिवरामराजे कारण आहेत. मुख्यमंत्री होण्याची ताकद त्या व्यक्तीत होती. राजमाता सत्वशीलादेवींनी कलावंतांना राजाश्रय दिला. त्यांचा आदर्श आताच्या पिढीने घेतला पाहिजे. कारण, आज इनकमिंच्या नावाखाली राजघराण्याच नाव खराब केलं जातं आहे. राजघराण्याने याचे भान विसरू नये. अन्यथा, मायकल डिसोजांप्रमाणे आरोप करण्याची टाप कोणाची होणार नव्हती. त्यांनी केलेले आरोप गंभीर असून आज सावंतवाडी विकायला काढली का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. उद्या शहरातील गंभीर परिस्थिती बघता यात कोणाचा जीव गेला तर मनुष्य वधाचा गुन्हा कोणावर दाखल करायचा ? तुमच्या निवासस्थानी पाटेकराच स्थान असून ते अधिपत्य आहे. हे विसरून चालणार नाही. हिंदू धर्म कोणाला धमकावण्यासाठी नाही असाही टोला हाणला.
दरम्यान, आजगावात आठही गावातील ग्रामस्थांची बैठक झाली होती. मायनिंगच संकट त्यांच्यावर घोंगावत असताना ड्रोन सर्व्हे तिथे होत होते. त्या ड्रोनला कॅमेरे नसून सेन्सर बसवले होते, जमीनीची सोनोग्राफी सुरू होती. याचा उद्रेग झालेला काल दिसला. विरोध असताना देखील सर्वेक्षणाची परवानगी तिथे दिली गेली. ग्रामसभेचे या विरोधात ठराव असताना ते धूडकावून आलेल्यांना अटक का झाली नाही ? असा सवाल डॉ.परूळेकर यांनी केला. हे फक्त सर्वेक्षण असल्याचे सांगितलं जात असून ते हास्यास्पद आहे. जर खासगी कंपनी सर्व्हे करणार असेल तर महसूल प्रशासन कशासाठी आहे ? प्रशासनाने त्या कंपनीसाठी काम करू नये लोकांसाठी कराव. तसेच याला पर्यावरणाची किनार देखील आहे. वन्यजीवांच अस्तित्व तिथे असताना असे पर्यावरणास हानी पोहचणारे प्रकल्प होऊ नये. विरोध केला की मग आम्हाला काळी मांजर म्हटलं जातं, म्हणजे 'ब्लॅक कॅट' आमचं काम त्या कमांडोसारखच आहे. अवैध मायनिंग जिल्ह्यात होत असून याकडे प्रशासनाच लक्ष नाही की यामध्ये हातमिळवणी आहे ? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तर, हे सगळे पर्यावरणास हानी करणारे प्रकल्प रत्नागिरी, सिंधुदुर्गात का ? एखादा तरी नागपूरला घेऊन जा असाही टोला हाणला.











