
सावंतवाडी : हैदराबादहून कुडाळच्या दिशेने जाणाऱ्या एका वेगवान कंटेनरने आंबोली घाटातील केसरी गावापासून दोन किलोमीटर अंतरावरील एका वळणावर समोरून येणाऱ्या कारला ठोकर दिली. आणखी एका कारचेही नुकसान त्याने केले. अपघात करून घटनास्थळावरून पळून जाणाऱ्या कंटेनर चालकाला पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने झाराप झिरो पॉईंट येथे पकडले. याप्रकरणी सावंतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कंटेनर (क्रमांक TG 07 E 4751) चा चालक परमेश्वर वर्मा हा आपल्या ताब्यातील कंटेनर घेऊन कुडाळच्या दिशेने जात होता. आंबोली घाटात केसरी गावाजवळ एका वळणावर चालकाचे समोरून कोल्हापूरच्या दिशेने जाणाऱ्या 'सियाझ' कारला (क्रमांक MH 03 CB 8619) ठोकर दिली. ही धडक देऊन कंटेनर थांबला नाही, तर त्याने पुढे जात एका 'टाटा पंच' कारच्या उजव्या बाजूच्या आरशालाही धडक दिली.
या केल्यानंतर चालक परमेश्वर वर्मा हा कंटेनरसह कुडाळच्या दिशेने वेगात पळून गेला. हा प्रकार पाहून दुचाकीस्वारांनी त्याचा पाठलाग केला आणि बुरडी पुलाजवळ कंटेनरला थांबवले. मात्र, चालक कंटेनरमधून खाली उतरला नाही. त्याने काही वेळातच दुचाकीस्वारांना हुलकावणी दिली आणि पुन्हा गाडी वेगाने पुढे घेऊन गेला. घटनेची माहिती तात्काळ पुढे देण्यात आली. पोलिसांनी झाराप झिरो पॉईंट या ठिकाणी ट्रॅफिक पोलीस आणि स्थानिक नागरिकांनी सापळा रचून या कंटेनरला अडवले आणि चालकाला ताब्यात घेतले. या अपघातात वाहनांचे मोठे नुकसान झाले असून काही लोकांना किरकोळ दुखापती झाल्या आहेत. अतिवेगाने व धोकादायक रित्या वाहन चालवून अपघात करणे, वाहनांचे नुकसान करणे, लोकांना दुखापतीस कारणीभूत ठरणे आणि अपघातस्थळावरून पळून जाणे याप्रकरणी चालक परमेश्वर वर्मा विरुद्ध सावंतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.














