LIVE UPDATES

स्वप्ना गोवेकर लिखित पाठ आता 6वीच्या पाठ्यपुस्तकात

सावंतवाडीसाठी अभिमानास्पद बातमी
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: June 16, 2026 15:11 PM
views 116  views

सावंतवाडी : ​सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील प्रसिद्ध युवा कवयित्री व लेखिका स्वप्ना गोवेकर लिखित पाठ आता इ. ६ वी च्या पाठ्यपुस्तकात समाविष्ट करण्यात आलेला आहे. महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ पुणे यांनी या पाठाची निवड विद्यार्थ्यांना अभ्यासण्यासाठी केलेली आहे.

​विद्यार्थी, शिक्षक व पालक यांनी आत्मसात करण्याजोगी मूल्ये या पाठात असल्या कारणाने या पाठाची निवड तज्ज्ञ कमिटीकडून करण्यात आली अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. इयत्ता सहावी 'बालभारती' मराठीच्या पाठ्यपुस्तकात हा पाठ घेतला असून 'राष्ट्रध्वज माझा अभिमान' असे या पाठाचे शीर्षक आहे.

​स्वप्ना गोवेकर लिखित पाठाच्या या निवडीसाठी महाराष्ट्र मराठी अध्यापक संघाच्या शिक्षकांनी तसेच सिंधुदुर्ग पतंजली योग समितीच्या पदाधिकाऱ्यांनी लेखिकेचे अभिनंदन केले आहे.

​सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षापासून येत्या पुढे ६ वर्षांसाठी हा अभ्यासक्रम असणार आहे. बदललेल्या अभ्यासक्रमाची ही नवीन पाठ्यपुस्तके आता महाराष्ट्रातील सर्व शाळांमधून उपलब्ध होणार आहेत. लेखिका स्वप्ना गोवेकर यांचे सन २०१९ मध्ये 'आठवणी आजोळच्या' हा कथासंग्रह तर २०२३ मध्ये 'काव्यरंग' हा कवितासंग्रह प्रकाशित झाला असून त्याला कोकण मराठी साहित्य परिषदेचा वाङ्मयीन पुरस्कार देखील मिळालेला आहे.