LIVE UPDATES

पीक विम्यासाठी एक गुंठ्याची अट शिथिल करण्याची वेंगुर्ला पं. स. सभेत ठराव

डेंग्यूच्या वाढत्या प्रादुर्भावावर उपाययोजनांचे निर्देश
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: November 04, 2026 06:54 PM
views 19  views

वेंगुर्ला : वेंगुर्ला तालुक्यातील अल्पभूधारक शेतकऱ्यांना पीक विम्याचे संरक्षण मिळावे, डेंग्यूच्या वाढत्या प्रादुर्भावावर तातडीने उपाययोजना कराव्यात तसेच रखडलेल्या विकासकामांना गती द्यावी अशा विविध महत्त्वपूर्ण विषयांवर वेंगुर्ला पंचायत समितीच्या मासिक सभेत चर्चा करण्यात आली. सभापती शंकर घारे यांच्या अध्यक्षतेखाली बॅ. नाथ पै सभागृहात ही सभा संपन्न झाली.

यावेळी उपसभापती सचिन देसाई, गटविकास अधिकारी वासुदेव नाईक, सहाय्यक गटविकास अधिकारी दिनेश पाटकर, पंचायत समिती सदस्य विष्णू फणसेकर, नितीन मांजरेकर, संकेत धुरी, सुचिता वजराटकर, साक्षी नार्वेकर, शितल राऊत-बांदवलकर, प्रियांका घाटवळ यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

एक गुंठा क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यालाही पीक विमा मिळावा

शासनाने पीक विम्याबाबत सातबाऱ्यावर १० गुंठ्यांपेक्षा कमी क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांना विमा भरता येणार नाही, असा नियम लागू केल्याने कोकणातील अल्पभूधारक शेतकऱ्यांवर अन्याय होण्याची शक्यता आहे. वेंगुर्ला तालुक्यात आंबा पिकाच्या बागा लहान क्षेत्रात असून अनेक शेतकऱ्यांकडे कमी जमीन आहे. त्यामुळे अशा शेतकऱ्यांना विमा संरक्षणापासून वंचित राहावे लागणार आहे. ही बाब लक्षात घेऊन एक गुंठा जरी क्षेत्र असले तरी संबंधित शेतकऱ्याला पीक विमा संरक्षण मिळावे, असा ठराव सभापती शंकर घारे यांनी सभेत मांडला.

 डेंग्यूचा प्रादुर्भाव; तातडीच्या उपाययोजनांचे निर्देश

तालुक्यातील काही भागांत डेंग्यूचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळत असल्याचा मुद्दा उपसभापती सचिन देसाई यांनी उपस्थित केला. विशेषतः खानोली, वायंगणी परिसरासह वेंगुर्ला शहरातही डेंग्यूचे रुग्ण आढळत असल्याने आरोग्य विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. यावर तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, अशा सूचना त्यांनी तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना दिल्या.

आडेली धरणावरील वृक्षतोडीची चौकशी करा

आडेली धरण परिसरात मोठ्या प्रमाणात वृक्षतोड झाल्यामुळे त्या ठिकाणी भूस्खलन होऊन धरणाला धोका निर्माण झाल्याचा आरोप सदस्य नितीन मांजरेकर यांनी केला. याप्रकरणी वन विभागाने नेमकी काय कारवाई केली, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

सामान्य नागरिकाने एक झाड तोडले तरी त्याच्यावर कारवाई केली जाते. मग एवढ्या मोठ्या वृक्षतोडीच्या प्रकरणात वन विभाग गप्प का, असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली. तसेच वेतोरे पालकरवाडी येथे जलजीवन मिशनअंतर्गत करण्यात आलेले काम अद्याप अपूर्ण असताना पाणीपुरवठा विभागाकडून ग्रामपंचायतीला हे काम ताब्यात घेण्यास सांगितले जात असल्याचा मुद्दाही त्यांनी मांडला. सुमारे ८० लाख रुपये खर्चाच्या या कामाची पूर्तता झाल्यानंतरच ग्रामपंचायतीने ते ताब्यात घ्यावे, अशी भूमिका मांजरेकर यांनी स्पष्ट केली.

..अन्यथा पालकमंत्र्यांची भेट घेणार : सचिन देसाई

चिपी येथील खारबंधाऱ्याच्या रखडलेल्या कामावर उपसभापती सचिन देसाई यांनी आक्रमक भूमिका घेतली. या बंधाऱ्याच्या कामाला विलंब होत असल्यामुळे खारट पाणी नागरिकांच्या विहिरींमध्ये जात असून नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. काम पूर्ण करण्यासाठी १२ महिन्यांचा कालावधी असताना सात महिने उलटूनही प्रत्यक्ष कामाला सुरुवात झालेली नाही, याबाबत त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

ठेकेदार कामात टाळाटाळ करत असतील तर त्यांना काळ्या यादीत टाकण्याची कारवाई करावी. येत्या आठ दिवसांत कामाला सुरुवात झाली नाही, तर पालकमंत्री नितेश राणे यांची भेट घेऊन संपूर्ण वस्तुस्थिती त्यांच्या निदर्शनास आणून देणार असल्याचा इशारा देसाई यांनी दिला. अधिकारी ठेकेदारांना पाठीशी घालत असतील तर त्यांच्यावरही कारवाई करण्याची मागणी पालकमंत्र्यांकडे करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

दिवाळीनंतर शाळा, अंगणवाडी व ग्रामपंचायतींना अचानक भेटी

दिवाळीनंतर पंचायत समितीचे सभापती, उपसभापती व सदस्य तालुक्यातील कोणत्याही ग्रामपंचायत, शाळा किंवा अंगणवाडीला अचानक भेट देऊन तेथील कामकाजाचा आढावा घेणार आहेत. यासंदर्भात शिक्षण विभागाने आवश्यक ती तयारी ठेवावी, अशा सूचना उपसभापती सचिन देसाई यांनी दिल्या.

बंद पडलेल्या शाळांच्या इमारतींचा अन्य कामांसाठी वापर करा

पटसंख्येअभावी बंद पडलेल्या प्राथमिक शाळांच्या इमारतींची दुरवस्था होऊ नये, यासाठी सदस्य विष्णू ऊर्फ आपा फणसेकर यांनी महत्त्वपूर्ण सूचना मांडली. अशा शाळांच्या सुस्थितीत असलेल्या इमारती ग्रामपंचायत, गावातील बचतगट किंवा शासकीय कार्यालयांना वापरासाठी उपलब्ध करून द्याव्यात. त्यामुळे इमारतींची योग्य निगा राखली जाईल आणि त्यांचा उपयोगही होईल, असे त्यांनी सांगितले.

या सभेत सदस्य शितल राऊत-बांदवलकर यांनी वायंगणी शाळा क्रमांक २ च्या नवीन इमारतीचे बांधकाम तसेच दाभोली अंगणवाडीच्या नवीन इमारतीच्या कामाचा प्रश्न उपस्थित केला. वारंवार पंचायत समितीच्या सभेत हे विषय मांडूनही प्रत्यक्ष कार्यवाही होत नसल्याबद्दल त्यांनी अधिकाऱ्यांवर नाराजी व्यक्त केली. सभापती व उपसभापती यांनी या प्रश्नांकडे विशेष लक्ष देण्याची मागणी त्यांनी केली. यावर दाभोली अंगणवाडीच्या इमारतीची निर्लेखन प्रक्रिया सुरू असल्याचे, तर वायंगणी शाळेच्या छप्पर दुरुस्तीसाठी आठ लाख रुपयांचा निधी मंजूर असल्याचे संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले. याबाबत एकत्रित बैठक घेऊन पुढील कार्यवाही करण्याचे ठरविण्यात आले.

उभादांडा ग्रामपंचायतीच्या विविध तक्रारी व चौकशीच्या विषयावर सदस्य साक्षी नार्वेकर यांनी प्रश्न उपस्थित केला. ग्रामपंचायतीविरोधातील तक्रारींच्या अनुषंगाने प्रशासनाने त्रिस्तरीय समिती नेमून तिच्यामार्फत अहवाल सादर केला आहे. असे असताना पुन्हा तक्रारदारांकडून पुरावे सादर करण्यास का सांगितले जात आहे, असा सवाल उपसभापती सचिन देसाई यांनी उपस्थित केला. समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्यावर सुनावणी घेणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांनी योग्य तो निर्णय घ्यावा, अशी भूमिका त्यांनी मांडली. सभेच्या शेवटी सभापती, उपसभापती आणि गटविकास अधिकारी यांनी उपस्थित सर्वांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या.


ताजी बातमी

View all

Farmers in Sindhudurg benefit from the Ahilyadevi Holkar Farmer Loan Waiver Scheme 2026, with ₹18.51 crore credited to 3,397 farmers.
जिल्ह्यातील ३,३९७ शेतकऱ्यांच्या कर्जखात्यात १८.५१ कोटी रुपये जमा
November 04, 2026
Ashpak Mulani Murder Case : खून करून अपघाताचा बनाव केल्याप्रकरणी प्रमुख आरोपीला जामीन मंजूर
November 04, 2026
दुष्काळामुळे पाणी वाचवण्यासाठी कुडाळ शहरातील कारंजे बंद ठेवण्याचा निर्णय
November 04, 2026
Traditional Konkani poha being prepared at a rice mill in Sindhudurg ahead of Diwali amid reduced paddy production.
Sindhudurg Poha : सिंधुदुर्गात भात उत्पादन घटल्याने गावठी पोहे महागणार
November 04, 2026
संबंधित बातम्या

View all

Farmers in Sindhudurg benefit from the Ahilyadevi Holkar Farmer Loan Waiver Scheme 2026, with ₹18.51 crore credited to 3,397 farmers.
जिल्ह्यातील ३,३९७ शेतकऱ्यांच्या कर्जखात्यात १८.५१ कोटी रुपये जमा
November 04, 2026
दुष्काळामुळे पाणी वाचवण्यासाठी कुडाळ शहरातील कारंजे बंद ठेवण्याचा निर्णय
November 04, 2026
Traditional Konkani poha being prepared at a rice mill in Sindhudurg ahead of Diwali amid reduced paddy production.
Sindhudurg Poha : सिंधुदुर्गात भात उत्पादन घटल्याने गावठी पोहे महागणार
November 04, 2026
सावंतवाडीत सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचा शैक्षणिक उपक्रम
November 04, 2026