
कणकवली : कणकवली पोलीस ठाण्याच्या पथकाने असलदे शिवाजीनगर परिसरात अवैध दारू विक्रीविरोधात प्रकरणी संशयित आरोपी अवधूत शामसुंदर वाळके (वय ४६, रा. असलदे शिवाजीनगर, ता. कणकवली) व महेश मारुती मोरये (वय ३५, रा. नांदगाव वाशीनवाडी, ता. कणकवली) यांच्या विरुद्ध कणकवली पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम १९४९ चे कलम ६५(ई) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत १९ हजार २०० रुपयांचा गोवा बनावटीचा मद्यसाठा जप्त केला आहे. स्थानिक बीट अंमलदार यांचा दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
गावात दारुबंदी असताना दारु विक्रीची हिंमत कशी ?
असलदे गावात दारूबंदी असताना गोवा बनावटीची अवैध दारू विक्री करणाऱ्यांविरोधात ग्रामस्थांनी मंगळवारी आक्रमक भूमिका घेतली आहे. नुकत्याच झालेल्या पोलिस कारवाईनंतर संबंधितांना जाब विचारत चांगलीच समज दिली. गावातील शांतता, सामाजिक वातावरण आणि युवकांचे भविष्य धोक्यात घालणाऱ्या अवैध दारू विक्रीला ग्रामस्थांनी ठाम विरोध दर्शविला आहे. यावेळी संशयित आरोपी अवधूत शामसुंदर वाळके या अवैध दारू विक्री करणाऱ्या इसमाने दारू विक्री करत असल्याची कबुली देत असलदे गावाची माफी मागितली. यापुढे गावात दारु विक्री करणार नसल्याचे माफी मागत जाहीरपणे सांगितले आहे.
असलदे शिवाजीनगर येथे आरोपी अवधूत शामसुंदर वाळके यांच्या गोडाऊन कणकवली पोलिसांनी ७ जून रोजी रात्री १२.३० धाड टाकली. यानंतर गावात ग्रामसभेमध्ये दारूबंदी चा ठराव असताना देखील अवैध दारूचा व्यवसाय होत असल्याने ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेतली. याबाबत मंगळवारी रात्री संशयित आरोपी अवधूत शामसुंदर वाळके तर सुरेंद्र वायंगणकर याला फोन करत कडक शब्दात दारू व्यवसाय बंद करण्याचा इशारा दिला आहे. यावेळी सरपंच चंद्रकांत डामरे, पत्रकार भगवान लोके, नरेंद्र हडकर, उपसरपंच सचिन परब, व्हाइस चेअरमन दयानंद हडकर, सोसायटी संचालक शत्रुघ्न डामरे, माजी सरपंच पंढरी वायंगणकर, महेश लोके, रघुनाथ लोके, प्रवीण डगरे, प्रदीप हरमलकर, विजय आचरेकर, मनोज लोके, संदेश आचरेकर, अनिल लोके, दयानंद डगरे,विजय खरात, रुपेश खरात, गोविंद लोके, संतोष घाडी, संतोष डामरे, विष्णू डगरे, राजू जेठे, संदीप नरे, प्रमोद डामरे आदींसह गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.
दारू विक्री करणाऱ्यांना विचारला जाब
नांदगाव तिठा येथे मंगळवारी सायंकाळी असलदे गावातील ग्रामस्थांनी एकत्र येत श्री.वाळके याला जाब विचारला .यावेळी तू गावात दारूबंदी असताना दारू विक्री का करतो? गावातील अनेक तरुण व्यसनाधीन झाले आहेत त्याला जबाबदार कोण? गोव्याची विषारी दारू कमी पैशात आणून जास्त रक्कमेत विकून स्वतःचा फायदा करता का? विषारी दारु विकून दहा ते पंधरा जण मयत झाले आहेत त्याला जबाबदार कोण? अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत, अनेक महिला विधवा झाल्या आहेत, मुले वाऱ्यावर आली आहेत, हे तुमच्यासारख्या लोकांमुळेच झाले झाले असल्याचा आरोप सरपंच चंद्रकांत डामरे, पत्रकार भगवान लोके, नरेंद्र हडकर, शत्रुघ्न डामरे, महेश लोके, दयानंद हडकर यांच्यासह ग्रामस्थांनी करत जाब विचारला. यावेळी दारूबंदी ही झालीच पाहिजे नाहीतर असलदे गाव गप्प बसणार नसल्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.













