LIVE UPDATES

सांडपाणी व्यवस्थापन व पुर्नवापर प्रकल्प हलक्यात घेता का ?

- उपनगराध्यक्ष ॲड अनिल निरवडेकरांकडून प्रशासनाची शाळा - भाजप नगरसेवकांकडून उत्तर देताना संजू परबांनी रोखल ; सेनेच उपनगराध्यक्षांना समर्थन
Edited by:
Published on: June 17, 2026 11:47 AM
views 62  views

सावंतवाडी : मी प्रभारी नगराध्यक्ष असताना सांडपाणी व्यवस्थापन व पुर्नवापर विषय मांडला होता‌. सावंतवाडीची अस्मिता असणाऱ्या या गोष्टीवर प्रशासनाकडून पुढील कार्यवाही काय झाली ? आजची या विषयावरची ही तिसरी बैठक असताना त्यावर पाठपुरावा का झाला नाही ? असा सवाल करत उपनगराध्यक्ष ॲड अनिल निरवडेकर यांनी सीओंचे कान टोचले.
यावेळी भाजप सभापती आनंद नेवगी व सुधीर आडीवरेकर बोलत असल्याने भाजप नगरसेवकांनी याच उत्तर देऊ नये, मुख्याधिकारी यांनी द्यावे अशी सुचना माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक संजू परब यांनी केली.
दरम्यान, याबाबत प्रस्ताव करण्याच्या सुचना आम्ही केल्या आहेत. शासनाकडून एजन्सीशी संपर्क साधला असता अजून डीपीआर त्यांनी दिलेला नाही. प्रत्येक बँकेला जागतिक बँकांकडून सहाय्य घेऊन हे काम करण्यास सांगितले असून तो जीआर आज ठेवला आहे असं उत्तर मुख्याधिकारी यांनी दिली. दरम्यान, तुमचं उत्तर समर्पित नसून शासनाकडून हा प्रकल्प आला आहे. बैठकीत आम्ही त्याचे प्लानिंग केल असून तिनं महिन्यात कार्यवाही झाली नाही, हा माझा प्रश्न आहे. जर तुम्ही पत्रव्यवहार केले तर त्याचे पुरावे सभागृहात द्यावे, असे आवाहन ॲड. अनिल निरवडेकर यांनी केले असता फोनवरून चर्चा झाल्याचे सीओंनी सांगितले. यावेळी सावंतवाडीची सांडपाणी व्यवस्थापन व पुर्नवापर प्रकल्प प्रशासनाकडून हलक्यात घेतली जाते का ? असा सवाल उपनगराध्यक्षांनी केला. तर नगरसेवक अजय गोंदावळे यांनी ही योजना सावंतवाडीसाठी फार महत्त्वाची असल्याचे सांगत ॲड. निरवडेकर यांना समर्थन दिले. यावेळी नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोंसले यांनी यात हस्तक्षेप करत यावर गांभीर्याने विचार केला जाईल असे स्पष्ट केले.