LIVE UPDATES

57 कोटींच्या नळपाणी योजनेत भ्रष्टाचार ?

ठेकेदार पळवणार तोंडचं पाणी ?
Edited by: विनायक गांवस
Published on: June 16, 2026 20:31 PM
views 86  views

  • 20 कोटीच बीलही अदा ; निकृष्ट कामाचा आरोप 

सावंतवाडी : रत्नागिरीत नळपाणी योजना फेल घालवणाऱ्या ठेकेदाराकडून सावंतवाडीतील सुवर्ण जयंती नगरोत्थान योजनेअंतर्गत मंजूर ५७ कोटींच्या नळपाणी योजनेचही काम झालं असून प्रशासकीय काळापासून हे काम सुरू आहे. दोन वर्षांची मुदत असताना चार वर्ष या योजनेच काम सुरू असून हे काम निकृष्ट दर्जाचे असून हॉटमिक्स जागी कोल्डमिक्सचा वापरल्याचाही आरोप येथील नागरिक गितेश पोकळेंनी माहितीच्या अधिकारात माहिती मिळवत केला आहे. याबाबत मुख्याधिकारी यांनी देखील कोल्डमिक्सचा वापर ठेकेदारान केला असता त्याला रोखण्यात आल्याचेही स्पष्ट केले आहे. त्यामुळे या योजनेच्या कामात भ्रष्टाचार झाल्यासह पाईपलाईनमधून टक्केवारीच पाणी पोहोचल्याबाबतही आता सवाल उपस्थित होऊ लागलेत. 


माहितीच्या अधिकारात माहिती मिळवत श्री. पोकळे म्हणाले, सावंतवाडीच्या नळपाणी योजनेच्या कामाची मुदत दोन वर्षे असून चार वर्ष हे काम सूरू आहे. याचे काम निकृष्ट दर्जाचे असून हॉटमिक्सचे काम कोल्डमिक्सने केल गेलं. तर बील मात्र हॉट मिक्सच्या दराने दिली गेली. त्याचीही प्रत आम्ही मागितली असून अद्याप ती मिळालेली नाही. याच ठेकेदाराने रत्नागिरीत केलेल काम फेल गेल असून एकही थेंब पाणी येत नाही. सावंतवाडीच्या कामाची चौकशी व्हावी यासाठी आयुक्तांकडेही आम्ही तक्रार केली आहे. प्रभारी नगराध्यक्ष असताना या योजनेला त्रिसदस्यीय अहवालापर्यंत काम रोखण्यासाठीचे निर्देश दिले होते. मात्र, हे काम नंतर कस सुरू झालं ? हा प्रश्न आहे. क्वालिटी कंट्रोल पीडबल्यूडी व्हीजीलंसकडून याची चौकशी होण आवश्यक आहे. २४ महिन्यानंतर प्रतीदिन १ हजार दंड ठेकेदाराला आहे. त्यामुळे तो कापला गेला का ? सुसज्ज लॅब, ठेकेदाराच कार्यालय इथे नाही, ते आवश्यक होते. तसेच १ रूपयांपासूनचे ५७ कोटींचे व्हिडिओ रेकॉर्डिंग जमा करणं आवश्यक होते. मात्र, ते झालेले नसून हे काम निकृष्ट दर्जाचे आहे असा आरोप गितेश पोकळे यांनी केलाय. 


दरम्यान, २०२३ मध्ये ही योजना मंजूर झाली असून तिची निविदा प्रक्रियाही पूर्ण झाली होती. मात्र, तांत्रिक कारणांमुळे प्रत्यक्ष काम सुरू होण्यास एक वर्षाचा कालावधी लागला. काही महिन्यांपूर्वीच या कामाला गती आली असून पहिल्या टप्प्यातील पाईपलाईन टाकण्याचे काम शहरातील काही भागांत पूर्ण झाले आहे. आता दुसऱ्या टप्प्याचे काम पावसाळ्यानंतर हाती घेतले जाईल. या योजनेबाबत काही नागरिकांनी तक्रारी दाखल केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर, संबंधित विभागाचे प्रभारी अभियंता तुषार सरडे हे नगरपालिकेकडून योग्य ती बाजू आणि अहवाल संबंधित विभागाकडे निश्चितपणे सादर करणार असल्याचे स्पष्टीकरत पाणी पुरवठा सभापती प्रतीक बांदेकर यांनी दिले. 


तर या आरोपांबाबत प्र. मुख्याधिकारी विनायक औंधकर यांना विचारलं असता ते म्हणाले, योजनेच काम योग्य पद्धतीने सुरु आहे. ठेकेदाराकडून हॉटमिक्स जागी कोल्डमिक्स वापरण्याचा प्रयत्न केला गेला होता. मात्र, नगरपरिषदेच्या ही बाब लक्षात येताच ठेकेदाराला रोखले आहे. बील अदा करताना योग्य पद्धतीनेच केली असून सर्व माहिती संबंधितांना दिली जाईल. आतापर्यंत २० कोटी रूपयांची बील अदा करण्यात आली असून संबंधित ठेकेदाराकडून न.प.कडे कार्यालय देखील सुरू करण्यात येत आहे‌. पूर्वी ते धरण परिसरातून कामकाज करत होते. एकंदरीतच, रत्नागिरीत नळपाणी योजना फेल घालवल्याच्या आरोपानंतर सावंतवाडीतील परिस्थिती बघता संबंधीत ठेकेदार सावंतवाडीकरांच्या तोंडचं पाणी पळवणार तर नाही ना ? असा सवाल उपस्थित होत आहे.