LIVE UPDATES

Kudal Talathi Bribe Case : पिंगुळीचे तलाठी जितेंद्र खेताडे यांना जामीन मंजूर

ओरोस विशेष न्यायालयाचा निर्णय : सातबारा उताऱ्यावरील नोंदीसाठी ५ हजार रुपयांची लाच स्वीकारल्याचा होता आरोप
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: October 24, 2026 07:24 PM
views 33  views

ओरोस / कुडाळ : सातबारा उताऱ्यावर नोंद करण्याच्या मोबदल्यात ५ हजार रुपयांची लाच स्वीकारल्याच्या आरोपावरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ACB) जाळ्यात अडकलेले पिंगुळी (ता. कुडाळ) येथील ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) संशयित जितेंद्र काळू खेताडे यांना ओरोस येथील विशेष न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. या निर्णयामुळे भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत कारवाईचा सामना करत असलेल्या खेताडे यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदाराने सातबारा उताऱ्यावर नोंद करण्यासाठी ५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचा आरोप तलाठी खेताडे यांच्यावर केला होता. मात्र, लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने २३ ऑक्टोबर २०२६ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, सिंधुदुर्गकडे रीतसर तक्रार दाखल केली.

तक्रारीची शहानिशा केल्यानंतर एसीबीच्या पथकाने लाचेच्या मागणीची पडताळणी करून सापळा रचला. तलाठी कार्यालयात भेट न झाल्याने तक्रारदाराने खेताडे यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधला. त्यानुसार कुडाळ-वेंगुर्ला मार्गावरील रेल्वे पुलाजवळ ५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीच्या पथकाने त्यांना रंगेहाथ पकडून कारवाई केली. या प्रकरणी कुडाळ पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम, १९८८ च्या कलम ७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

तपासादरम्यान पोलिसांनी संशयित आरोपीला न्यायालयासमोर हजर करून पुढील चौकशीसाठी पोलीस कोठडीची मागणी केली होती. रिमांड रिपोर्टमध्ये पडताळणी, सापळा कारवाई आणि गुन्ह्याच्या पुढील तपासाचे मुद्दे नमूद केले होते.

दुसऱ्या बाजूने आरोपीच्या वतीने न्यायालयात जामीन अर्ज दाखल करण्यात आला. सुनावणीवेळी बचाव पक्षाचे वकील अ‍ॅड. सुहास सावंत यांनी प्रभावी युक्तिवाद केला. "आरोपीची कोठडीत ठेवून चौकशी करण्याची कोणतीही सबळ कारणे पोलिसांनी दिलेली नाहीत. तसेच, आरोपीला अटक करताना सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या कायदेशीर मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्यात आलेले नाही," असा मुख्य मुद्दा बचाव पक्षाने मांडला.

दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर विशेष न्यायालयाने बचाव पक्षाने मांडलेले मुद्दे ग्राह्य धरले आणि संशयित आरोपी जितेंद्र काळू खेताडे यांचा जामीन मंजूर केला. यामुळे न्यायालयाच्या अटी व शर्तींच्या अधीन राहून त्यांची सुटका होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या प्रकरणात आरोपीच्या वतीने अ‍ॅड. सुहास सावंत, अ‍ॅड. निलांगी सावंत, अ‍ॅड. उमा सावंत, अ‍ॅड. रसिका सावंत, अ‍ॅड. संदेश कोएगावकर आणि अ‍ॅड. धनश्री टेंबुलकर यांनी वकीलपत्र सांभाळले.