
दोडामार्ग : महावितरणच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. आचरा येथील घटनेनंतर साटेली-भेडशी येथेही कंत्राटी कामगार मोहन गावडे हे विजेच्या खांबावरून पडून जखमी झाले. त्यांच्या मणक्याला दुखापत झाली असून, अपघाताला तीन दिवस उलटूनही संबंधित कंत्राटदार किंवा अधिकाऱ्यांनी साधी विचारपूसही केली नसल्याचा गंभीर आरोप कंत्राटी कामगार संघटनेचे नेते अशोक सावंत यांनी केला आहे.
संघटनेच्या माहितीनुसार, जिल्ह्यात गेल्या १५ ते १६ वर्षांत कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या अपघातांच्या अनेक घटना घडल्या. मात्र अपघातानंतर कर्मचाऱ्यांना आवश्यक मदत, संरक्षण आणि सुविधा मिळत नसल्याचा आरोप अशोक सावंत यांनी केला. मदतनीस म्हणून नियुक्त कर्मचाऱ्यांकडूनही विजेच्या खांबावर चढून काम करून घेतले जात असल्याचा दावा त्यांनी केला. संबंधित कंत्राटदाराने महावितरणच्या अधिकाऱ्यांकडून अपघाताची माहिती मिळाली नसल्याचे सांगितल्याचेही सावंत यांनी नमूद केले. जखमी कर्मचारी मोहन गावडे यांना तातडीने आर्थिक मदत द्यावी आणि न्याय मिळवून द्यावा, या मागणीसाठी महावितरणच्या अधीक्षक अभियंता व कार्यकारी अभियंत्यांची भेट घेणार असल्याचे सावंत यांनी स्पष्ट केले.
काम बंद आंदोलन करू
"मोहन गावडे यांना न्याय मिळाला नाही, तर संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात काम बंद आंदोलन छेडण्यात येईल,” असा ठाम इशारा अशोक सावंत त्यांनी दिला. कंत्राटी कामगार संघटना अपघातग्रस्त कर्मचाऱ्याच्या पाठीशी ठामपणे उभी राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले. जिल्हाध्यक्ष संदीप बांदेकर, दोडामार्ग उपाध्यक्ष रामचंद्र कापडोस्कर, आबा चव्हाण, मयूर गवस, उदय सावंत व अन्य कर्मचारी उपस्थित होते.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all








