
देवगड : देवगड-जामसंडे नगरपंचायतीच्या प्रभाग क्रमांक १० मधील विकासकामांवरून सुरू असलेल्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर नगरसेविका तथा उपनगराध्यक्षा मिताली राजेश सावंत यांनी समन्वय समितीच्या कार्यपद्धतीवर आक्षेप घेतला आहे. प्रभागातील विकासकामे यापूर्वीच नगरपंचायतीच्या ठरावात प्रस्तावित केली असल्याने अशा समितीची आवश्यकता नसल्याची भूमिका त्यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे मांडली आहे.
प्रभागातील नागरिकांना आपल्याविरोधात भडकविण्याचा प्रयत्न केला जात असून, सोशल मीडिया ग्रुपवर किरकोळ कामांच्या याद्या प्रसिद्ध करणे, खोटे व खोडसाळ आरोप करणे आणि बॅनर लावून बदनामी करण्याचे प्रकार सुरू असल्याचा आरोप सावंत यांनी केला आहे. या प्रकारांमुळे आपल्याला मानसिक त्रास होत असून, आपली व पक्षाची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
प्रभाग क्रमांक १० मधील विकासकामे २७ सप्टेंबर २०२२ रोजीच नगरपंचायतीच्या ठरावात प्रस्तावित केली होती, असा दावा सावंत यांनी केला. यापूर्वी प्रस्तावित केलेल्या कामांचे श्रेय घेण्यासाठी नगरपंचायतीकडून कामांची यादी घेऊन ती पालकमंत्र्यांच्या माध्यमातून मंजूर करून घेतल्याची प्रसिद्धी केली जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.
एप्रिल २०२३ मध्ये भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक १० मध्ये सुमारे तीन ते चार कोटी रुपयांची विकासकामे आणल्याचे सावंत यांनी सांगितले. यातील काही कामे पूर्ण झाली असून, काही कामे प्रतीक्षा यादीत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
देवगड-जामसंडे नगरपंचायतीच्या सर्व १७ प्रभागांमध्ये नगरसेवक सक्षमपणे काम करीत असून, नागरिकांचे सहकार्य मिळत असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. प्रभागातील विकासकामांबाबत वस्तुस्थिती नागरिकांसमोर यावी, यासाठी गेल्या तीन वर्षांतील कामांची यादी प्रसिद्ध केली असल्याचेही त्यांनी नमूद केले.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all








