
सावंतवाडी : व्यवसायाने यांत्रिकी अभियंता असलेल्या गिरीश विजय मेस्त्री यांची ‘अर्धवट आयुष्य’ ही मराठी कादंबरी वाचकांच्या भेटीस आली आहे. तांत्रिक क्षेत्रात तब्बल १८ वर्षे कार्यरत असतानाही मानवी भावना, नाती आणि सामाजिक वास्तवाचा वेध घेत त्यांनी या कादंबरीची शब्दरचना केली आहे.
श्री. मेस्त्री हे मराठी लेखक असून मानवी जीवन, नाती, भावना, संघर्ष आणि समाजातील वास्तव यांचे सूक्ष्म निरीक्षण करण्याची त्यांना आवड आहे. याच संवेदनशीलतेतून त्यांच्या लेखणीतून ‘अर्धवट आयुष्य’ या कादंबरीचा जन्म झाला. त्यांच्या लेखनातून सामान्य माणसाच्या, विशेषतः स्त्रीच्या मनातील न बोललेल्या भावना आणि संघर्ष वाचकांसमोर आणण्याचा प्रयत्न आहे. 'अर्धवट आयुष्य’ यात एका स्त्रीच्या आयुष्याभोवती केंद्रित असलेली हृदयस्पर्शी आणि भावनिक कथा आहे.










