
सावंतवाडी : मळेवाड जकातनाका बाजारपेठ परिसरातील विविध समस्यांकडे संबंधित विभागांचे लक्ष वेधण्यासाठी मळेवाड बाजारपेठ व्यापारी संघटनेच्या वतीने बांधकाम विभाग तसेच विद्युत पुरवठा विभागाला निवेदन देण्यात आले.
मळेवाड बाजारपेठ व्यापारी संघटनेची बैठक घेण्यात आली. या बैठकीत बाजारपेठ परिसरातील धोकादायक अवस्थेतील सर्कल तसेच जीर्ण झालेले विद्युत पुरवठा पोल या गंभीर समस्यांवर चर्चा करण्यात आली. सर्व व्यापारी व दुकानदारांच्या एकमताने सदर समस्यांबाबत संबंधित विभागांना निवेदन देण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी संघटनेचे अध्यक्ष रमाकांत नाईक, उपाध्यक्ष अशोक शिरसाट, सचिव मदन मुरकर, नंदू नाईक व प्रकाश राऊत यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून या समस्यांवर लवकरात लवकर कार्यवाही करण्याची मागणी करून निवेदन देण्यात आले.यावेळी बांधकाम विभागाचे अजित पाटील( सावंतवाडी) तसेच विद्युत विभागाचे श्री. पेटकर (वेंगुर्ले)यांनी संबंधित समस्यांबाबत लवकर निर्णय घेऊन आवश्यक कामे करण्याचे आश्वासन दिले.बाजारपेठेतील नागरिक व व्यापाऱ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने या समस्यांवर तातडीने कार्यवाही होण्याची अपेक्षा व्यापारी संघटनेने व्यक्त केली.










