
नवी दिल्ली : दिल्लीतील बुराडी भागात एका सूटकेसमध्ये १७ वर्षीय मुलीचा मृतदेह सापडल्याची घटना समोर आली आहे. याबाबत मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी कारवाई करीत मृत तरुणीच्या एका नातेवाईकाला अटक केली आहे. मृत्यूचे कारण आणि हत्येमागील हेतू शोधण्याचे काम पोलीस करत आहेत.
गुप्त माहितीच्या आधारे कारवाई
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 'आउटर नॉर्थ डिस्ट्रिक्ट'च्या 'स्पेशल स्टाफ' पथकाला या गुन्ह्याबाबत गुप्त माहिती मिळाली आणि त्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले. या हत्येची यापूर्वी कोणतीही तक्रार दाखल झाली नव्हती. माहितीच्या आधारे पथकाने सापळा रचून आरोपीला अटक केली. त्यानंतर आरोपीने पोलिसांना जिथे मृतदेह लपवून ठेवण्यात आला होता त्या ठिकाणापर्यंत नेले.
पोलिसांनी सांगितले की, सखोल चौकशीनंतर आरोपी नातेवाईकाने हत्येतील आपला सहभाग कबूल केला. त्याने पोलिसांना बुराडीमधील अजित विहार येथील त्या ठिकाणापर्यंत नेले, जिथे तरुणीचा मृतदेह एका सूटकेसमध्ये लपवून ठेवण्यात आला होता.
अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला की, आरोपी हा त्या तरुणीचा नातेवाईक असून त्याला अटक करण्यात आली आहे. आरोपीने दिलेल्या माहितीच्या आधारे मृतदेह ताब्यात घेण्यात आलेला आहे. आवश्यक कायदेशीर प्रक्रिया सुरू असून हे प्रकरण बुराडी पोलीस ठाण्याकडे सोपवण्यात आले आहे. याप्रकरणी एफआयआर नोंदवण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास केला जात आहे. मृत्यूचे कारण आणि हत्येमागील हेतू शोधण्याचे काम पोलीस करत आहेत.
घटनास्थळावरून गोळा केलेले फॉरेन्सिक आणि इतर पुरावे पोलीस तपासत असून घटनेचा नेमका क्रम जुळवण्याचा प्रयत्न करत आहेत. आरोपी सध्या पोलीस कोठडीत असून, कथित हत्या आणि मृतदेह लपवण्यामागची कारणे जाणून घेण्यासाठी त्याची चौकशी केली जात आहे. तपासादरम्यान गोळा केलेल्या पुराव्यांच्या आधारे पुढील कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले.














