LIVE UPDATES

Sawantwadi News : सावंतवाडी पोलिसांची धडाकेबाज कामगिरी

वेत्येतील चोरीची डिलक्स दुचाकी अवघ्या दोन तासांत हस्तगत : एकाला अटक
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: October 28, 2026 08:54 PM
views 89  views

सावंतवाडी : पोलिसांच्या धडाकेबाज कामगिरीमुळे वेत्ये येथून चोरीला गेलेली नवीन डिलक्स दुचाकी अवघ्या दोन तासांत हस्तगत करण्यात यश आले आहे. पोलिसांनी याप्रकरणी एका चोरट्याला चोरीच्या दुचाकीसह रंगेहात अटक केली असून, न्यायालयात हजर केले असता त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

फिर्यादी विजय लांडगे यांनी आपली नवीन डिलक्स दुचाकी वेत्ये येथे हायवेनजीक असलेल्या एका उघड्या शेडमध्ये उभी केली होती. तिथून ती अज्ञात व्यक्तीने चोरून नेली. आपली दुचाकी चोरीला गेल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी तात्काळ सावंतवाडी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली.

तक्रार प्राप्त झाल्यानंतर पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांनी प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत तपासाची चक्रे वेगाने फिरवली. दरम्यान, चोरीस गेलेली ती दुचाकी एका संशयिताकडून वेंगुर्ले-निवती मार्गावरून नेण्यात येत असल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे सावंतवाडी पोलिसांनी तातडीने निवती पोलिसांशी संपर्क साधून समन्वय साधला.

पोलिसांनी सापळा रचून एका टेम्पोमधून चोरीची दुचाकी घेऊन चाललेल्या संशयिताला शिताफीने ताब्यात घेतले. याप्रकरणी साबाजी उर्फ प्रदीप भिकाजी रावळ (रा. आंदुर्ले, कुडाळ) याच्यावर सावंतवाडी पोलीस ठाण्यात दुचाकी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बुधवारी त्याला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. या घटनेचा पुढील अधिक तपास पोलीस धोत्रे करत असून पोलिसांच्या या जलद तपासाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.