
कणकवली : कणकवली ते कुडाळ दुचाकीने जात असताना दुचाकीस्वार उमेश प्रदीप कदम (34, रा. आंब्रड) यांचा दुचाकीवरील ताबा सुटून दुचाकी दुभाजकाला धडकल्याने झालेल्या अपघातात दुचाकीवर मागे बसलेल्या प्राची प्रदीप मसूरकर (32, रा. हिरलोक, ता. कुडाळ) या गंभीररित्या जखमी झाल्या होत्या. त्यांच्यावर आरोस जिल्हा रुग्णालयात उपचार करून अधिक उपचारासाठी गोवा बांबुळी येथे दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान मंगळवारी त्यांचा मृत्यू झाला. हा अपघात सोमवार 26 रोजी पहाटे 5.40 च्या सुमारास महामार्गावर वागदे येथे हॉटेल विश्रांती नजीक घडला होता.
प्राची या कणकवलीतील एका खाजगी रुग्णालयात कामाला होत्या. त्या सोमवारी पहाटे कणकवली ते कुडाळ अशा दुचाकीवरून मागे बसून जात असताना दुचाकी वागदे येथे महामार्गावर हॉटेल विश्रांती नजीक दुभाजकावर आदळली. त्यात प्राची मसूरकर या गंभीर जखमी झाल्या होत्या तर दुचाकीस्वार उमेश कदम यांनाही दुखापत झाली होती. जखमींना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर प्राची यांना अधिक उपचारासाठी गोवा बांबूळी येथे दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांचे मंगळवारी निधन झाले.
त्याबाबतची फिर्याद प्राचीचे वडील सुनील शिवराम चव्हाण (रा. हिरलोक) यांनी कणकवली पोलिसांत दिली. याप्रकरणी रस्त्याच्या विशिष्ट परिस्थितीकडे दुर्लक्ष करून दुचाकी दुभाजकावर आढळून स्वतःच्या दुखापतीस तसेच प्राची मसुरकर यांच्या दुखापतीस व मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी कणकवली पोलिसांनी दुचाकीस्वार उमेश प्रदीप कदम (रा. आंब्रड) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी अधिक तपास कणकवली पोलीस करत आहेत.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all








