LIVE UPDATES

Devgad News : 5 अवैध पर्ससीन मासेमारी नौकांवर कारवाई

मुणगे समुद्रात ”ऑपरेशन शाश्वत सागर” ; मत्स्यव्यवसाय विभागाच्या धडक मोहिमेने धाबे दणाणले
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: October 29, 2026 01:52 PM
views 68  views
#kokansadlive#news update#konkan update#

देवगड: मत्स्यव्यवसाय विभागाने मुणगे समोरील समुद्रात अवैध पद्धतीने पर्ससीन मासेमारी करणाऱ्या एका मोठ्या व चार लहान नौकांवर कठोर कारवाई केली. अंदाजे दहा ते बारा वाव पाण्यात मासेमारी करत असलेल्या या पाचही नौकांवर महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम (२०२१) अंतर्गत कारवाई करण्यात आली असून, कायदेशीर कार्यवाहीची पुढील प्रक्रिया सुरू आहे.

सदर कारवाई दिनांक २८ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारच्या वेळी पार पडली. देवगड येथील अंमलबजावणी अधिकारी तथा परवाना अधिकारी किरण वाघमारे व मालवण येथील अंमलबजावणी अधिकारी तथा परवाना अधिकारी गणेश टेमकर यांच्या संयुक्त नेतृत्वाखाली ही मोहीम राबविण्यात आली. सागरी सुरक्षा पर्यवेक्षक व सुरक्षा रक्षकांच्या सक्रिय सहभागाने ही कारवाई यशस्वी झाली. संपूर्ण मोहीम सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय सागर कुवेसकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

अधिकाऱ्यांनी मुणगे समोरिल समुद्रात नियमित गस्तीदरम्यान संशयास्पद नौकांची सखोल तपासणी केली. अवैध पर्ससीन जाळ्यांचा वापर करून मासेमारी केल्याचे निदर्शनास आल्यानंतर खालील पाच नौका ताब्यात घेण्यात आले असून विभागाच्या कायद्यांतर्गत पुढील कार्यवाही प्रस्तावित आहे.

१) IND-MH-५-MM-४४२९ (नौकेचे नाव : अल मोहम्मदी-५ RR)

२) IND-MH-५-MM-५४९३ (नौकेचे नाव : आमिन-१)

३) IND-MH-५-MM-४१६३ (नौकेचे नाव : अल-बुराक RR)

४) IND- MH-५-MM-५१०४ (नौकेचे नाव : फातिमा-२) व 

५) नौका फैजा 

मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांच्या कठोर व स्पष्ट भूमिकेमुळे विभागातील अधिकारी अत्यंत तत्पर, सजग व जबाबदार असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. वेळोवेळी आवश्यक व प्रभावी कारवाई केल्या जात असल्याने स्थानिक मच्छिमार समुदायात समाधान व्यक्त होत आहे. अवैध मासेमारी रोखण्यासाठी मत्स्यव्यवसाय विभागाने सागरी क्षेत्रात नियमित गस्ती व संयुक्त कारवाया सुरू ठेवल्या आहेत.

विभागाने स्पष्ट केले आहे की, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कोणत्याही नौकेवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल आणि भविष्यातही अशा धडक मोहिमा सुरू राहतील.