
सावंतवाडी : नागपंचमीच्या सणाचा आनंद साजरा करण्यासाठी कुडाळ येथील मूळ गावी गेलेल्या कुटुंबाच्या अनुपस्थितीचा गैरफायदा घेत अज्ञात भामट्यांनी मोरडोंगरी-माजगाव येथील बीएसएनएल कॉलनीत धाडसी घरफोडी केली. एकाच रात्रीत तब्बल तीन घरे फोडून चोरट्यांनी एक्युम्युलेटेड २५ लाख रुपयांचे ३१ तोळे सोन्याचे दागिने, ३५ ग्रॅम चांदी, रोकड आणि एक मोटारसायकल लांबवली. या घटनेमुळे सावंतवाडी शहर आणि परिसर हादरून गेला असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसराले आहे.
फिर्यादी सिद्धी चंद्रशेखर रेडकर (वय ४०, मूळ रा. एमआयडीसी ओंकार नगर, कुडाळ) या सध्या सावंतवाडीतील मोरडोंगरी-माजगाव येथील बीएसएनएल कॉलनीत घर क्रमांक १२३२ मध्ये राहतात. नागपंचमीच्या सणानिमित्त त्या पती आणि मुलासह १६ ऑगस्ट रोजी कुडाळ येथील मूळ घरी गेल्या होत्या. १६ ऑगस्टच्या रात्री ११ ते १७ ऑगस्टच्या सकाळी ७ वाजेच्या सुमारास बंद घराची संधी साधून अज्ञात चोरट्याने त्यांच्या घराच्या मुख्य दरवाजाचा कोयंडा कोणत्यातरी हत्याराने कट केला. घरात घुसून चोरट्यांनी संपूर्ण सामान अस्ताव्यस्त फेकून दिले आणि लोखंडी कपाटाचा दरवाजा उचकटून लॉकरमध्ये ठेवलेले दागिने आणि रोकड लंपास केली.
यात ४ लाख रुपये किमतीचे ५ तोळ्यांचे मीनावर्कचे मोठे मंगळसूत्र, २ लाख ४० हजार रुपयांचे ३ तोळ्यांचे सोन्याचे मंगळसूत्र, ८० हजार रुपये किमतीचे एक तोळ्याचे सोन्याचे मंगळसूत्र, २ लाख ४० हजार रुपये किमतीचे ३ तोळ्यांचे कोयरी डिझाईनचे २ सोन्याचे तोडे, ६ लाख ४० हजार रुपयांच्या ८ तोळ्यांच्या ४ सोन्याच्या बांगड्या, २ लाख ४० हजार रुपये किमतीच्या ३ तोळ्यांच्या सोन्याच्या तीन चैनी (ज्यात गणपती व साईबाबांचे लॉकेट आहे), १ लाख २८ हजार रुपयांच्या ५ सोन्याच्या अंगठ्या, १ लाख २० हजार रुपयांचे सोन्याचे बाजूबंद, १ लाख २० हजार रुपयांचा जाळीचा हार, ६४ हजार रुपयांचे सोन्याचे ब्रेसलेट, १ लाख ६० हजार रुपयांची ४ जोड कानातील कर्णफुले, ४८ हजार रुपयांची कानातली साखळी, २ हजार रुपये किमतीचे ३५ ग्रॅम चांदीचे दागिने आणि ३ हजार रुपयांची रोकड असा मोठा ऐवज चोरीला गेला. याशिवाय फिर्यादीचे वडील बापू मारुती तुळसकर यांच्या मालकीची १५ हजार रुपये किमतीची जुनी वापरती सुपर स्प्लेंडर मोटारसायकल (क्रमांक MH-07-R-5522) देखील अज्ञात चोरट्याने पळवून नेली.
केवळ एवढ्यावरच न थांबता या अज्ञात चोरट्यांनी याच परिसरातील मोरडोंगरी येथे राहणारे रामचंद्र सावंत (वय ५५) आणि मारुती सिताराम सावंत (वय ६१) यांचीही घरे फोडून चोरी केली.सकाळी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर परिसरात प्रचंड खळबळ उडाली. याप्रकरणी सिद्धी रेडकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून सावंतवाडी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३३१(३), ३३१(४), ३०५ आणि ३०३(२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १७ ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास या गुन्ह्याची अधिकृत नोंद करण्यात आली असून, पोलीस अज्ञात आरोपींचा कसून शोध घेत आहेत.













