
दोडामार्ग : तिलारी नदीच्या घोटगेवाडी येथील काॅजवे वरून वाहून गेलेल्या दोघांपैकी सहा वर्षीय रेगण दिलीप बडा याचा मृतदेह तब्बल २१ तासानंतर मिळाला आहे. तर अनुरंजन किसपोट्टाचा मृतदेह अद्याप मिळाला नसून शोधमोहिम सुरू आहे. सिंधुदुर्ग ऍडव्हेंचर रेस्क्यू टीम सांगेली आंबोली यांनी शोध मोहीम राबविली.
घोटगेवाडी येथे राहणारे परप्रांतीय अनुरंजन हे सहा वर्षीय रेगण सहित प्रथम घोटगेवाडी ते कोनाळकट्टा असे काही कामानिमित्त गेले होते. मात्र पुन्हा ते घरी परतण्यास निघाले असता काॅजवेवर अचानक पाण्याचा प्रवाह वाढला. त्यामुळे दोघेही पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहून गेले. ही बातमी वार्यासारखी पसरली. सायंकाळी उशिरा तालुका आपत्ती व्यवस्थापन विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.
मात्र काळोख होऊ लागल्याने शोध मोहीम राबविणे शक्य झाले नाही. शोध मोहीम राबविण्यासाठी तालुका आपत्ती व्यवस्थापन विभागाची यंत्रणाच तोकडी होती. अखेर सह्याद्री एडवेंचर रेस्क्यू टीमला पाचारण केले. ही टीम मंगळवारी सकाळी घटनास्थळी दाखल झाली. त्यांनी बोटींच्या साह्याने नदी पात्र पिंजण्यास सुरुवात केली. अखेर मंगळवारी दुपारी २:४५ वाजण्याच्या सुमारास घोटगे येथील पुला जवळ चिमुकल्याचा मृतदेह झाडाला अडकलेल्याe स्थितीत मिळाला. तो बाहेर काढून शवविच्छेदनासाठी येथील दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला. तर अनुरंजन याचा मृतदेह न मिळाल्याने त्याची शोध मोहीम सायंकाळी तिलारीच्या कुडासे नदी मध्ये उशिरापर्यंत सुरू होती. यावेळी तालुका आपत्ती व्यवस्थापन विभागाचे अधिकारी, तहसीलदार राहुल गुरव व कर्मचारी घटनास्थळी उपस्थित होते.
तिलारी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता अनुपस्थित
एवढी मोठी घटना घडूनही तिलारी पाटबंधारे प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता योगेश पाटील हे घटनास्थळी अनुपस्थित होते. त्यांना कालपासून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता ते कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद दे नसल्याचे संतप्त ग्रामस्थांनी सांगितले. आपत्ती काळात तालुका आपत्ती व्यवस्थापन सजग राहणे आवश्यक आहे. मात्र कार्यकारी अभियंता योगेश पाटील हे याला अपवाद असल्याचा संतप्त ग्रामस्थांनी आरोप केला आहे. याबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी योगेश पाटील यांना मोबाईलद्वारे संपर्क केला असता त्यांनी फोन उचलला नाही.
शोध मोहीमेसाठी तिलारी मुख्य धरण व तेरवण मेढे उन्नैयी बंधाऱ्याचा पाणीपुरवठा बंद
तिलारी नदीत बुडालेल्या दोघांची शोध मोहीम राबविण्यास अडचण ठरू नये यासाठी तिलारी मुख्य धरण व तेरवण मेढे उन्नैयी बंधाऱ्याचा पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे. त्यामुळे शोध मोहीम राबविणे शक्य झाले. आता धरण व बंधाऱ्यातील पाणीसाठा जलद गतीने वाढत असल्याने आज मंगळवारी सायंकाळी पाण्याचा विसर्ग करणे अनिवार्य असल्याचे जलसंपदा विभागाचे उपकार्यकारी अभियंता गजानन बुचडे यांनी सांगितले.
चिमुकल्याचा यंदाच इयत्ता पहिलीत प्रवेश
रेगण बडा या चिमुकल्याने यंदाच घोटगेवाडी येथील शाळेत इयत्ता पहिलीला प्रवेश घेतला होता. मात्र नियतीच्या मनात वेगळेच होते. त्याच्या निधनाने कुटुंबावर शोककळा पसरली आहे
तहसीलदार स्वतः शोध कार्यात बोटमध्ये
दरम्यान घटनास्थळी शोध मोहिमेसाठी दाखल झालेल्या सह्याद्री एडव्हेंचर टीम सोबत दोडामार्ग तहसीलदार राहुल गुरव हे स्वतः लाईफ जॅकेट घालून रेस्क्यू टीमसोबत तिलारी नदीत शोधकार्यासाठी उतरले. त्याच दरम्यान पाचशे मीटर अंतरावरील घोटगे पुलानजिक मुलाचा मृतदेह आढळून आला. दरम्यान सायंकाळी कुडासे नदीच्या दिशेने शोध कार्य केले मात्र कुठेही आढळून आला नाही. दरम्यान सायंकाळची अंधार झाल्याने शोध कार्य थांबविण्यात आले.












