
कणकवली : कोकण रेल्वे मार्गावरून जाणारी रेल्वे गाडी कणकवली रेल्वे स्थानकाच्या अगदी नजीकच असणाऱ्या हळवल रेल्वे फाटकातच थांबल्याने फाटक उघडण्याची वाट बघणाऱ्या कित्येक वाहन चालकांच्या भुवया उंचावल्या.
दरम्यान एका प्रवाशाने 'इमर्जन्सी चेन' ओढल्याने ट्रेन फाटकात थांबल्याची बाब उघड झाली. हा प्रकार मंगळवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास घडला.
घटनेची माहिती समजतात रेल्वे सुरक्षा बलाचे हवालदार प्रदीप कुमार घटनास्थळी दाखल झाले होते. एका प्रवाशाचा मोबाईल ट्रेन बाहेर पडला. त्याच कारणास्तव प्रवाशाने ट्रेन थांबवणारी 'इमर्जन्सी चेन' ओढली, असे रेल्वे सुरक्षा बलांकडून सांगण्यात आले. तर काही वेळानंतर ट्रेन तेथून मार्गस्थ झाली.
हळवल फाटक रस्त्यावर वाहनांची नेहमीच वर्दळ असते. परिणामी घडल्या प्रकाराचा अनेकांना मनस्ताप सहन करावा लागला.










