
सिंधुदुर्गनगरी : युवकाच्या अंगावर अचानक कार कोसळली. काकीही त्याच्यासोबत कारखाली अडकली. महामार्ग आणि सर्व्हिस रोडमधील अवघ्या तीन फुटांच्या जागेत पुतण्या-काकी मदतीसाठी विव्हळत होते. काही क्षणांसाठी घटनास्थळी काळजाचा ठोका चुकवणारे वातावरण निर्माण झाले. अखेर महामार्ग वाहतूक पोलिस आणि सिंधुदुर्गनगरी पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने कारखाली अडकलेल्या पुतण्या-काकीची सुटका केली. या अपघातात युवक गंभीर जखमी झाला असून त्याला पुढील उपचारासाठी गोव्यातील बांबोळी येथे हलविण्यात आले आहे.
मुंबई-गोवा महामार्गावर सावंतवाडा येथे मंगळवारी (१८ ऑगस्ट) दुपारी सव्वातीनच्या सुमारास भरधाव कारवरील चालकाचे नियंत्रण सुटून झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वार इंद्रजीत बोडेकर (२३) हा गंभीर जखमी झाला, तर त्याच्यासोबत असलेल्या त्याच्या काकी पुष्पा बोडेकर (५०), दोन्ही रा. ओरोस, रवळनाथनगर, या किरकोळ जखमी झाल्या. कारमधील चालकासह सहप्रवाशालाही किरकोळ दुखापत झाली.
मिळालेल्या माहितीनुसार, मारुती सुझुकी स्विफ्ट कार (केए २२ पी ७३६१) कणकवलीहून कुडाळच्या दिशेने बॉक्सवेलमार्गे जात होती. सावंतवाडा परिसरात आल्यानंतर अचानक चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले. कार महामार्गाच्या कडेला असलेल्या संरक्षक कठड्यावर आदळली. त्यानंतर कठडा तोडून कार सर्व्हिस रोडवरून जाणाऱ्या दुचाकीवर (एमएच ०७ एपी ५०८८) कोसळली.
दुचाकीवरून इंद्रजीत व त्यांची काकी पुष्पा बोडेकर ओरोस फाट्याकडून सुलोचनगरच्या दिशेने जात होते. कारसोबत संरक्षक रेलिंगही दुचाकीस्वाराच्या अंगावर पडल्याने इंद्रजीत गंभीर जखमी झाला. त्याच्या मानेला गंभीर दुखापत झाली. कार आणि संरक्षक रेलिंगच्या खाली दुचाकीसह पुतण्या-काकी अडकले. महामार्ग आणि सर्व्हिस रोडमध्ये सुमारे तीन फूट उंचीचे अंतर असल्याने दोघांना बाहेर काढण्याचे आव्हान निर्माण झाले होते.
अपघाताची माहिती मिळताच महामार्ग वाहतूक पोलीस व सिंधुदुर्गनगरी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. यावेळी सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्याचे प्रभारी शेखर लव्हे यांनी घटनास्थळी स्वतः उतरून स्थानिकांच्या मदतीने बचावकार्य केले. कारखाली अडकलेल्या पुतण्या-काकीला बाहेर काढल्यानंतर रुग्णवाहिकेची वाट न पाहता शासकीय वाहनातून दोघांनाही तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.
गंभीर जखमी इंद्रजीतवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सिंधुदुर्ग येथे प्राथमिक उपचार करण्यात आले. त्यानंतर अधिक उपचारासाठी त्याला गोवा येथील बांबोळी रुग्णालयात हलविण्यात आले. पुष्पा बोडेकर यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. या अपघातात कार व दुचाकीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून महामार्गाच्या संरक्षक कठड्यासह स्ट्रीट लाईटचा पोलही तुटून पडला. अपघातामुळे काही काळ घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती.
याप्रकरणी कारचालक परशुराम लालप्पा लमानी (२७) रा. बागलकोट कर्नाटक सध्या रा. तरळे कणकवली यांच्याविरोधात निष्काळजीपणे वाहन चालवून दुखापत केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
'ते' ठरत आहे मृत्युंचे वळण!
भवानी मंदिरासमोरील हे वळण पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरले आहे. याच ठिकाणी यापूर्वीही अनेक गंभीर अपघात झाले असून अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे महामार्गाच्या बांधकामातील तांत्रिक त्रुटी, वळणाची रचना आणि सुरक्षेच्या अपुऱ्या उपाययोजनांमुळेच हे ठिकाण 'मृत्यूचा सापळा' बनल्याची भावना स्थानिक नागरिक व्यक्त करत आहेत.
"आणखी किती बळी गेल्यानंतर प्रशासन जागे होणार?" असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. या धोकादायक वळणाचे तातडीने तांत्रिक परीक्षण करून कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.










