LIVE UPDATES

जीव मुठीत धरून शिक्षण घेण्याची वेळ !

मुंबई विद्यापीठाच्या उप परिसरातील परिस्थिती
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: June 16, 2026 21:31 PM
views 48  views

  • न.प.च्या प्रशासकीय राजवटीतला कारभार 

सावंतवाडी : हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ज्ञानप्रबोधिनीमधील एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथील मुंबई विद्यापीठाच्या सिंधुदुर्ग उप परिसरातील जागेत १० महिन्यांपूर्वी सिलिंग कोसळलं होत. मात्र, अद्यापपर्यंत दुरूस्तीचे सोडा साध्या सफाईचेही सौजन्य प्रशासनाकडून दाखवलेल नाही‌. त्यामुळे पदवीचं शिक्षण घेण्यासाठी या ज्ञानप्रबोधिनीत येणाऱ्या  विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरून शिक्षण घेण्याची वेळ आली आहे‌. प्रशासकीय राजवटीतपासून आता  लोकनियुक्त प्रतिनिधी नगरपरिषदेत विराजमान झाल्यानंतरही तेथील  परिस्थिती जैसे थेच आहे‌. 


येथील जिमखाना मैदानावर शिवरामराजे भोसले ऐतिहासिक वस्तू संग्रहालय व कलादालन असून यावरील भागात हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ज्ञानप्रबोधिनी आहे. या भागात मुंबई विद्यापीठाच्या सिंधुदुर्ग उप परिसराचा कारभार चालतो. २०२४ ला विद्यापिठाचा येथील करार संपला होता. मात्र, त्याला मुख्याधिकारी यांनी प्रशासकीय राजवटीत ३ वर्षांची मुदतवाढ दिली. यातच गतवर्षी ऑगस्ट महिन्यात मोठ्या पावसात येथील सिलिंग खाली कोसळले. यावेळी वर्ग खोल्यात विद्यार्थी नसल्याने मोठा अनर्थ टळला. पहाटेच्या सुमारास हा प्रकार घडल्याने मोठी हानी झाली नाही. मात्र, गेल्या १० दहा महिन्यांत दुरूस्ती सोडा, इथे साधी सफाई देखील करण्यात आलेली नाही. बेंचवर पडलेले सिलिंगचे तुकडे तशाच अवस्थेत आहे. त्यामुळे एकाच वर्गखोलीत जीव मुठीत धरून विद्यार्थ्यांवर शिक्षण घेण्याची वेळ आली आहे. तर तेथील स्टाफ देखील छताकडे डोळे लावून कारभार करत आहे. या घटनेबाबत विद्यापीठाकडून नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी यांना पत्रव्यवहार केल्याचीही माहिती उपस्थितांना विचारलं असता देण्यात आली. 


दरम्यान, याबाबत प्र. मुख्याधिकारी विनायक औंधकर यांना विचारलं असता, या दुरूस्तीसाठी मुंबई विद्यापीठाच्या उप केंद्राला पत्रव्यवहार करण्यात आला आहे. त्यांनी ते करून घ्यायचे आहे. त्यांना मुदतवाढ देण्यात आली अशी माहिती त्यांनी दिली. एकंदरीतच, नगरपरिषदेच्या अखत्यारीत येणाऱ्या या इमारतीच्या सिलिंगच बांधकाम कोणी केलं ? ते बोगस कस निघालं ? ते खाली कसं कोसळलं ? आदी बरेच प्रश्न आता उपस्थित होत आहेत. तर दुसरीकडे मुदतवाढी नुसार हे विद्यापीठाचे उपकेंद्र वर्षभर इथे चालणार आहे. त्यामुळे शिक्षणासाठी इथे येणाऱ्या विद्यार्थ्यांना देखील आता सिलिंगकडे डोळे लावून अध्ययन करावे लागणार का ? तसेच यादरम्यान दुर्घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण ? आदी प्रश्न उपस्थित होऊ लागले  आहेत.