
वेंगुर्ले : जिल्हा परिषद सिंधुदुर्ग अखत्यारित असलेला व ग्रा. पं. वायंगणी-वेंगुर्ला कार्यक्षेत्रातील खानोली कोंडूरा येरम लिंग देवालय ग्रा. मा. ६० रस्त्याच्या कि. मी. १/१०० ते कि. मी. २/३०० या अस्तित्वातील भागाचे दर्जोन्नतीचे काम शासनाने मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत मंजूर केले. कामाचा शुभारंभ सन २०२१ मध्ये आमदार दीपक केसरकर यांच्या हस्ते करण्यात आला होता. या कामांमधील अनेक अडथळे पार करून मक्तेदाराने काम पूर्ण केले आहे. यामुळे सदर रस्त्याचा उपयोग ग्रामस्थांना होण्यासाठी सोमवार दिनांक १५ जून २०२६ रोजी ग्रामस्थांनी एकत्रित येत जमीन मालक तथा माजी सभापती पं. स. वेंगुर्ला दीपक नाईक यांच्या उपस्थितीत रस्ता वाहतुकीस खुला केला.
सदर रस्त्याचे काम प्रगतीपथावर असताना अनेक अडचणी उभ्या करण्यात आल्या. या रस्त्याच्या कामास त्वरीत स्थगिती मिळविण्यासाठी जिल्हा न्यायालय सिंधुदुर्ग येथे शासनाचे मुख्य सचिव ते ग्रा. पं. वायंगणी सचिवांपर्यंतच्या संबंधित सर्व कार्यालयातील प्रमुख अधिकाऱ्यां विरुद्ध दावा दाखल करण्यात आला. परंतु जिल्हा न्यायालयाने सदर कामास स्थगिती दिलेली नाही. सदर दावा प्रलंबित आहे.
वायंगणी - कोंडूरावाडीतील ग्रामस्थ आणि कोंडूरा समुद्र किनारी येणाऱ्या पर्यटकांसाठी हा रस्ता सोयीचा झालेला आहे. तसेच नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापनासाठी सदर रस्ता उपयोगी असल्याने ग्रामस्थांनी शासनाचे आभार मानलेले आहेत. जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग, मुख्य कार्यकारी अधिकारी जि. प. सिंधुदुर्ग, पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग, तसेच जि. प. ग्रामपंचायत विभाग, बांधकाम विभाग, उपविभागीय अधिकारी (महसूल) सावंतवाडी, तहसीलदार वेंगुर्ला, पोलीस निरीक्षक वेंगुर्ला, पंचायत समिती वेंगुर्ला, ग्रा. पं. वायंगणी कार्यालयातील अधिकारी कर्मचारी तसेच ग्रा. पं. वायंगणी आजी-माजी सरपंच, आमदार दीपक केसरकर, पालकमंत्री सिंधुदुर्ग नितेश राणे यांच्या सामायिक समन्वयाने सदरचे लोकोपयोगी विकास काम अनेक अडथळ्यांवर मात करून मुख्यमंत्री ग्रामसडक योजना सिंधुदुर्ग कार्यालयाने व मक्तेदाराकडून पूर्णत्वास नेले, त्याबद्दल ग्रामस्थांनी सर्वांचे आभार मानले आहेत,
यावेळी या रस्त्यासाठी जि. प. नावे जमिनी बक्षीस पत्राने दिलेले जमीनदार चंद्रकांत कोचरेकर, मनोहर मुणनकर, रामकृष्ण पेडणेकर, रघुनाथ मुणनकर, यशवंत पेडणेकर, संतोष मुणनकर, रेश्मा मुणनकर, विनायक पेडणेकर, प्रतिक्षा महेश मुणनकर, रश्मी पेडणेकर, कुंदा मुणनकर, रिया पेडणेकर, श्रीमती भागीर्थी पेडणेकर, मनीषा मुणनकर वगैरे ग्रामस्थ उपस्थित होते.










