
वैभववाडी : शहर स्वच्छ ठेवणं ही केवळ नगरपंचायतीची जबाबदारी नाही. येथील नागरिकांचीही तेवढीच जबाबदारी आहे. आपल शहर सुंदर ठेवण्यासाठी प्रत्येकाने आपल्यापासून सुरुवात केली पाहिजे असे आवाहन नगराध्यक्षा श्रद्धा रावराणे यांनी केले. महात्मा गांधी जयंतीनिमित्त वाभवे-वैभववाडी नगरपंचायत व वैभववाडी तालुका शिक्षण संस्थेच्या पुढाकाराने शहरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यावेळी सौ. रावराणे बोलत होत्या.
सौ. रावराणे पुढे म्हणाल्या, वैभववाडी शहर स्वच्छ ठेवण्यासाठी नगरपंचायतीकडून सातत्याने प्रयत्न केले जात असून, नागरिकांच्या सहभागामुळे या प्रयत्नांना अधिक बळ मिळते. शहर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी केवळ नगरपंचायतीची नसून प्रत्येक नागरिकानेही आपली जबाबदारी स्वीकारून स्वच्छतेच्या अभियानात सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले. स्वच्छता मिशन सिंधुदुर्गचे समन्वयक पत्रकार गणेश जेठे यांनी उपस्थितांना स्वच्छतेची शपथ दिली. त्यानंतर वैभववाडी शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष जयेंद्र रावराणे, जिल्हा परिषद सदस्य श्रावणी रावराणे, निवृत्त नायब तहसीलदार दिलीप पाटील आणि सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष संजय सावंत यांनी नागरिकांना स्वच्छता मोहिमेत सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले. यावेळी नागरिकांना पत्रके वाटून स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यात आली.
अर्जुन रावराणे विद्यालय व आनंदीबाई रावराणे महाविद्यालयाचे विद्यार्थी व शिक्षक मोठ्या संख्येने या मोहिमेत सहभागी झाले होते. यावेळी शाळकरी विद्यार्थ्यांनी स्वच्छतेसंबंधी घोषणाबाजी करत नागरिकांमध्ये जनजागृती केली. त्यांच्या घोषणांनी संपूर्ण बाजारपेठेतील वातावरण स्वच्छतेच्या संदेशाने भारावून गेले होते. सुमारे दोन तास ही स्वच्छता मोहीम सुरू होती.या अभियानाच्या माध्यमातून शहरातील दत्त मंदिर, पोलीस स्थानक, बसस्थानक, तहसीलदार कार्यालय परिसर स्वच्छ करण्यात आला.
या मोहिमेत उपनगराध्यक्ष प्रदीप रावराणे, नायब तहसीलदार सचिन कदम, माजी नगराध्यक्ष नेहा माईनकर, अक्षता जैतापकर, महेश संसारे, सुभाष रावराणे, नंदकुमार रावराणे, रणजीत तावडे, उत्तम सावंत, विनायक पाताडे, अनंत राणे, विजय जामदार, अनिल मेस्त्री, पत्रकार संजय सावंत, महेश रावराणे, मारुती कांबळे, मोहन पडवळ,अश्विनी पेडणेकर, गुरु सावंत, तुषार नेवरेकर, रोहित मोंडकर, प्रदीप राणे, शेख सर, सतीश घाडी, स्वच्छता अधिकारी राघव सावंत यांच्यासह नगरपंचायत पदाधिकारी, कर्मचारी, नागरिक आणि स्वच्छताप्रेमी सहभागी झाले होते.











