LIVE UPDATES

Devgad News : रक्ताच्या नात्यांनी फिरवली पाठ, खाकीने दिला अखेरचा खांदा !

दीपक परब यांच्या अंत्यसंस्कारासाठी कोणीच न आल्याने देवगड पोलिसांनी पार पाडले माणुसकीचे कर्तव्य
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: October 02, 2026 20:38 PM
views 64  views
Devgad police perform last rites of Deepak Parab after relatives fail to attend

देवगड : मृत्यूनंतर आपल्या माणसांनी अखेरचा निरोप द्यावा, अशी प्रत्येकाची अपेक्षा असते. मात्र, चांदोशी येथे मृतावस्थेत आढळलेल्या दीपक परब यांच्या नशिबी हा अखेरचा निरोपही आला नाही. ओळख पटवून नातेवाइकांना माहिती देऊनही अंत्यसंस्कारासाठी कोणीही उपस्थित राहिले नाही. अखेर देवगड पोलिसांनीच पुढाकार घेत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करून ‘खाकीतील माणुसकी’चा प्रत्यय दिला.

तळवडे बौद्धवाडी येथील सतीश रमेश जाधव (३८) यांची चांदोशी येथे शेतजमीन आहे. बुधवारी सकाळी आपल्या जमिनीनजीकच्या चिरेबंदी पत्राशेडमध्ये एक तरुण निपचित अवस्थेत पडलेला त्यांना दिसला. त्यांनी तातडीने याची माहिती तेथील पोलीस पाटलांना दिली. माहिती मिळताच देवगड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीस पाटील व सतीश जाधव यांच्या मदतीने त्या तरुणाला देवगड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले.

दरम्यान, मृत तरुणाची ओळख पटविण्यासाठी पोलिसांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून मोहीम राबवली. पोलिसांच्या तपासातून मृत तरुणाचे नाव दीपक परब असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर नातेवाइकांशी संपर्क साधून मृत्यूची माहिती देण्यात आली. मात्र, अंत्यसंस्कारासाठी एकही नातेवाईक उपस्थित राहिला नाही.

अखेर ज्यांनी जन्मभराची नाती जपली नाहीत, त्यांच्याऐवजी खाकी वर्दीतील पोलिसांनी दीपक परब यांना अखेरचा खांदा दिला. देवगड पोलिसांनी पुढाकार घेत देवगड स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले.

देवगडचे पोलीस निरीक्षक शाम बुवा यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष उगलमुगले, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रवीण सावंत, पोलीस हवालदार गणपती गावडे, आशिष कदम, कॉन्स्टेबल संतोष नाटेकर व विश्वास पाटील यांनी हे सामाजिक कर्तव्य पार पाडले.

रक्ताची नाती कधी कधी दूर जातात; पण माणुसकीची नाती अनोळखी असतानाही जवळ येतात, हे या घटनेने दाखवून दिले. कर्तव्याच्या चौकटीपलीकडे जाऊन देवगड पोलिसांनी केलेली ही संवेदनशील कृती खाकीतील माणुसकीची वेगळीच ओळख निर्माण करणारी ठरली.