मोरगाव येथे सील केलेली खनिजयुक्त माती चोरी

दोन डंपर व जेसीबी जप्त
Edited by: लवू परब
Published on: January 07, 2026 19:33 PM
views 289  views

दोडामार्ग :मोरगाव येथे गत वर्षी महसूल विभागाने सील केलेली खनीज युक्त माती चोरी करणाऱ्या दोन रिकामी डंपर व जेसीबी वर महसूल विभागाने कारवाई करत वाहने ताब्यात घेतली. व या प्रकरणी गुन्हाही दाखल करणार असल्याचे महसूल विभागाने सांगितले आहे.

या प्रकरणी मिळालेली अधिक माहिती अशी की, महसूल विभागाने गतवर्षी  मोरगाव येथे खनिजयुक्त मातीच्या अवैध साठ्यावर कारवाई केली होती. तब्बल १६८ ब्रास मातीसाठा सील करून ठेवला होता. मात्र अंधाराचा फायदा घेत सोमवारी रात्री या सील केलेल्या मातीसाठ्याजवळ काही वाहने असल्याचे महसूल विभागाला दिसून आले. सील केलेल्या मातीची चोरी होत असल्याचाच हा प्रकार असावा हे लक्षात येताच तेथे एक जेसीबीदोन डंपर महसूल विभागाला आढळून आले. दरम्यान डंपर चालकांनी तेथून पलायन केले. महसूल विभागाने कारवाई करत डंपर व जेसीबी जप्त केले.  तहसीलदार राहुल गुरव यांच्या नेतृत्वाखाली महसूल नायब तहसीलदार प्रज्ञा राजमाने, तलाठी श्रीराज सांभारे, पवन लोले, युयोभ चौगुले यांनी ही कारवाई केली.  ताब्यात घेण्यात आलेले डंपर पोलिस पाटील यांच्या ताब्यात दिल्याची माहिती महसूल विभागाने दिली. यावेळी सील केलेली माती चोरी प्रकरणी संबंधित संशयितांवर गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती महसूल विभागाने दिली. मात्र कारवाई सोमवारी रात्रीच्या दरम्यान होऊनही अद्याप गुन्हा दाखल का करण्यात आला नाही? हा सवाल मात्र गुलदस्तात आहे.