
नवी दिल्ली : आशियाई क्रीडा स्पर्धेच्या अंतिम सामन्यात शनिवारी भारताचा सलामीवीर फलंदाज अभिषेक शर्माने पाकिस्तानविरुद्ध धडाकेबाज अर्धशतकी खेळी केली. निशिन मैदानावर त्याने २८ चेंडूंत ६१ धावा केल्या, ज्यामध्ये तीन चौकार आणि सात षटकारांचा समावेश होता. त्याने अवघ्या २० चेंडूंत आपले अर्धशतक पूर्ण केले.
अभिषेकच्या टी-२० आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील हे १३ वे अर्धशतक ठरले. अंतिम सामन्यात हे अर्धशतक झळकावून त्याने अनेक विक्रम आपल्या नावावर केले. अभिषेकने प्रस्थापित केलेल्या त्या सहा विकरांवर आपण एक नजर टाकूया.
भारत-पाकिस्तान टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्याच्या एका डावात सर्वाधिक षटकार मारण्याच्या विक्रमात अभिषेक शर्माने युवराज सिंगची बरोबरी केली आहे. भारताचा माजी धडाकेबाज अष्टपैलू खेळाडू युवराजने २०१२ मध्ये अहमदाबाद येथे पाकिस्तानविरुद्धच्या टी-२० सामन्यात सात षटकार मारले होते.
तसेच, टी-२० आंतरराष्ट्रीय अंतिम सामन्यांमध्ये दोनदा ५० हून अधिक धावा करणाऱ्या भारतीय खेळाडूंच्या विशेष यादीतही अभिषेक सामील झाला आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेपूर्वी, त्याने २०२६ च्या टी-२० विश्वचषक अंतिम सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध २१ चेंडूंत ५१ धावा केल्या होत्या. असे करून अभिषेकने सुपरस्टार क्रिकेटपटू विराट कोहलीची बरोबरी केली.
ज्याने २०१४ आणि २०२४ च्या टी-२० विश्वचषक अंतिम सामन्यांत ५० हून अधिक धावा केल्या होत्या. तिलक वर्मानेही ही कामगिरी दोनदा केली आहे.
टी-२० क्रिकेटमध्ये ४०० किंवा त्याहून अधिक षटकार मारणारा अभिषेक पाचवा भारतीय खेळाडू ठरला आहे. सध्या त्याच्या नावावर ४०५ षटकार जमा आहेत. त्याच्या पुढे सूर्यकुमार यादव (४२९), संजू सॅमसन (४३०), विराट कोहली (४६०) आणि रोहित शर्मा (५६८) हे खेळाडू आहेत.
सर्वात कमी चेंडूंमध्ये ४०० षटकारांचा टप्पा गाठणाऱ्या खेळाडूंच्या यादीत अभिषेक दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे; त्याने ३,५१३ चेंडूंमध्ये ही कामगिरी केली.
वेस्ट इंडीजचा माजी फलंदाज ख्रिस गेल याने ३,५५७ चेंडूंमध्ये ४०० षटकार पूर्ण केले होते. वेस्ट इंडीजचा अष्टपैलू खेळाडू आंद्रे रसेल या यादीत अव्वल स्थानावर असून, त्याने ३,०२७ चेंडूंमध्ये ४०० षटकार ठोकले आहेत.
दरम्यान, टी-२० क्रिकेटमध्ये एका कॅलेंडर वर्षात दोनदा १०० हून अधिक षटकार ठोकणारा अभिषेक हा एकमेव भारतीय खेळाडू ठरला आहे. त्याने २०२६ मध्ये १०४ षटकार ठोकले आहेत, तर याआधी गेल्या वर्षी या सर्वात छोट्या फॉरमॅटमध्ये त्याने १०८ षटकार मारले होते.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all










