LIVE UPDATES

माडखोल शेतकऱ्यांचे ३ ऑगस्टला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण

Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: July 28, 2026 17:25 PM
views 22  views
#kokansadlive#news update#konkan update#

सावंतवाडी  :  माडखोल गावातील शेतकऱ्यांना २५ डिसेंबर २०२५ ते मार्च २०२६ या कालावधीत झालेल्या अवकाळी पाऊस व सततच्या हवामान बदलामुळे झालेल्या शेती नुकसानीसाठी शासनाने नुकसानभरपाई मंजूर केली आहे. मात्र, गावातील भगवान सिताराम राणे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात तक्रार अर्ज सादर करून शासनाकडे चुकीची व दिशाभूल करणारी माहिती दिल्याचा आरोप गावातील शेतकऱ्यांनी केला आहे. संबंधित तक्रारीमध्ये स्थानिक ग्राममहसूल अधिकारी व कृषी अधिकारी यांनी सुमारे २५० ते ३०० नुकसानभरपाई अर्जांपैकी जवळपास १०० अर्ज बोगस असल्याचे नमूद केल्याचा दावा करण्यात आला आहे.

या पार्श्वभूमीवर माडखोल गावातील सर्व शेतकऱ्यांनी एकत्रितपणे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, स्थानिक ग्राममहसूल अधिकारी, कृषी अधिकारी, पंच आणि शेतकरी यांच्या उपस्थितीत सुमारे २४७ शेतकऱ्यांचे पंचनामे, जबाब, पंचयादी व प्रत्यक्ष वस्तुस्थितीची पाहणी करून सर्व प्रक्रिया नियमाप्रमाणे पूर्ण करण्यात आली आहे. पंचनामे करताना जास्तीत जास्त पात्र शेतकऱ्यांना न्याय मिळावा, यासाठी प्रामाणिक प्रयत्न करण्यात आले. असे असताना, एका व्यक्तीने स्वतःच्या स्वार्थासाठी संपूर्ण प्रक्रिया खोडसाळ, चुकीची व बोगस असल्याचा आरोप करणे हे सर्व शेतकऱ्यांवर तसेच संबंधित अधिकाऱ्यांवर अन्याय करणारे असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. यामुळे शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी केली आहे की, मंजूर झालेली नुकसानभरपाई तातडीने वितरित करण्यात यावी तसेच स्थानिक ग्राममहसूल अधिकारी व कृषी अधिकाऱ्यांवर कोणतीही अन्यायकारक कारवाई करण्यात येऊ नये. अन्यथा, ३ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १० वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर माडखोल गावातील सर्व शेतकरी आपल्या कुटुंबासह, मुलाबाळासह बेमुदत आमरण उपोषणास प्रारंभ करतील, असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.यावेळी उपस्थित माडखोल सोसायटी चेअरमन, माजी उपसरपंच श्री जीजी राऊळ, माजी सरपंच श्री राजन राऊळ, बाळु शिरसाट, सोसायटी संचालक श्री प्रकाश नाईक, आंनद राऊळ, तसेच सत्यवान राऊळ, सुबोध राऊळ, पांडुरंग राऊळ, मोहन राऊळ, मनोज राऊळ, स्वप्निल राऊळ, विनेश तावडे बंटी सावंत , लखन आडेलकर, स्वप्निल आडेलकर उपस्थित होते.