
Justin greaves five wicket maiden : कसोटी क्रिकेटमध्ये सलग पाच 'मेडन ओव्हर्स'मध्ये पाच बळी (विकेट्स) घेत वेस्ट इंडिजचा अष्टपैलू खेळाडू जस्टिन ग्रीव्ह्सने इतिहास रचला आहे. ग्रीव्ह्सने केलेली ही कामगीरी कसोटी क्रिकेटच्या १५० वर्षांच्या इतिहासात कधीच घडली नव्हती. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात सलग पाच मेडन ओव्हर्समध्ये पाच बळी घेण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्रिनिदाद येथे सुरू असलेल्या आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप सामन्याच्या तिसऱ्या दिवशी, ग्रीव्ह्सने घातक गोलंदाजीच्या जोरावर पाकिस्तानी फलंदाजीची फळी कोलमडून टाकली.
दरम्यान, यापूर्वी हा विक्रम इंग्लंडचा वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडच्या नावावर होता. स्टुअर्ट याने जानेवारी २०१६ मध्ये जोहान्सबर्ग कसोटीत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध गोलंदाजी करताना सलग चार मेडन ओव्हर्समध्ये बळी घेतले होते. ग्रीव्ह्सने आता तो विक्रम मागे टाकला आहे. वेस्ट इंडिजने पहिल्या डावात ३११ धावा केल्या होत्या. त्यानंतर पाकिस्तान संघ फलंदाजी साठी उतरला तेव्हा एका टप्प्यावर पाकिस्तानची स्थिती मजबूत वाटत होती. संघाची धावसंख्या ३ बाद २४४ अशी होती त्यावेळी जस्टिन ग्रीव्ह्स गोलंदाजीसाठी आला. कर्णधार शान मसूदने आपले शतक पूर्ण केले होते. मात्र, मसूदचा बळी घेत ग्रीव्ह्सने पाकिस्तानचा डाव खिळखिळा केला. दुपारच्या जेवणापर्यंत पाकिस्तानची धावसंख्या ८ बाद २६७ अशी झाली होती.














