
सिंधुदुर्गनगरी : जुलै महिन्याच्या अखेरीस जिल्ह्यात पावसाचा जोर वाढल्याने धरणांच्या पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. जिल्ह्यातील १२ धरणे पूर्ण क्षमतेने भरली असून आणखी सहा धरणे पूर्ण भरण्याच्या मार्गावर आहेत. सध्या जिल्ह्यातील सर्व धरणांमध्ये मिळून ७६.७० टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला असून, आगामी काही दिवस पावसाचा जोर कायम राहिल्यास पाणीसाठ्यात आणखी वाढ होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
यंदाच्या पावसाळ्याच्या सुरुवातीला अपेक्षेप्रमाणे पाऊस न झाल्याने जिल्ह्यातील भातशेती संकटात सापडली होती. अनेक ठिकाणी भातलावणीची कामे रखडली होती, तर काही भागातील पिके करपण्याच्या स्थितीत होती. मात्र, जुलैच्या अखेरीस मुसळधार व समाधानकारक पाऊस झाल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. रखडलेल्या भातलावणीच्या कामांना वेग आला असून, करपलेली भातशेती पुन्हा जोमाने उभी राहत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
पावसाचा वाढता जोर नदी-नाले आणि जलसाठ्यांसाठीही वरदान ठरला आहे. अवघ्या पंधरा दिवसांपूर्वी म्हणजे जुलै महिन्याच्या मध्यावर जिल्ह्यात केवळ नऊ धरणे पूर्ण भरली होती आणि एकूण पाणीसाठा सुमारे ६० टक्के होता. त्यानंतर झालेल्या मुसळधार पावसामुळे आता धरणांतील पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली असून १२ धरणांनी शंभर टक्के पाणीसाठ्याची नोंद केली आहे. गतवर्षी याच कालावधीत जिल्ह्यातील १८ धरणे पूर्ण क्षमतेने भरली होती. त्या तुलनेत यंदा पावसाचे प्रमाण कमी असले तरी गेल्या काही दिवसांतील दमदार पावसामुळे जलसाठ्याची स्थिती समाधानकारक बनली आहे. आगामी काळात पावसाचा जोर कायम राहिल्यास जिल्ह्यातील उर्वरित धरणेही लवकरच तुडुंब भरण्याची शक्यता आहे.
पूर्ण क्षमतेने भरलेली धरणे
कोर्ले-सातंडी, आंबोली, मांडखोल, निळेली, हातेरी, सनमटेंब, पुळास, पावशी, शिरवल, हरकुळ, ओझरम आणि लोरे या १२ धरणांमध्ये १०० टक्के पाणीसाठा झाला आहे.
पूर्ण भरण्याच्या मार्गावर असलेली धरणे
शिवडाव, तरंदळे आणि विलवडे ही धरणे ९५ टक्क्यांहून अधिक भरली असून ती पूर्ण क्षमतेने भरण्याच्या उंबरठ्यावर आहेत. तर तिलारी आंतरराज्य, अरुणा आणि धामापूर या महत्त्वाच्या धरणांमध्ये ८५ टक्क्यांहून अधिक पाणीसाठा झाला आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास ही धरणेही लवकरच पूर्ण क्षमतेने भरतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.












