LIVE UPDATES

पत्नीला पाहण्यासाठी निघालेले वडील व मुलगी वाटेतूनच बेपत्ता

Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: July 29, 2026 19:54 PM
views 37  views

दोडामार्ग : मोरगाव येथून वडील व मुलगी बेपत्ता झाल्याची घटना उघडकीस आली आहे. दोघेही सावंतवाडी येथील एका खासगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या आपल्या पत्नीला पाहण्यासाठी निघाले होते. लाडोबा लवू कदम (४०) व निहालीका लाडोबा कदम (६) दोघेही रा. मोरगाव असे वडील व मुलीचे नाव आहे.

याबाबत प्रितम अर्जुन जाधव (३१, रा. मळगाव-जाधववाडी, ता. सावंतवाडी) यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे. दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांची बहीण प्राची यांच्यावर सावंतवाडी येथील एका खासगी रुग्णालयात पित्ताशयाच्या शस्त्रक्रियेनंतर उपचार सुरू होते. १६ जुलै २०२६ रोजी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास त्यांचे भावोजी लाडोबा लवू कदम हे आपली सहा वर्षीय मुलगी निहालिका हिला घेऊन मोरगाव येथून सावंतवाडीकडे निघाले असल्याची माहिती त्यांनी स्वतः फोन करून प्रितम कदम यांना दिली होती. मात्र दुपारपर्यंत ते हॉस्पिटलमध्ये न पोहोचल्याने कुटुंबीयांनी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा मोबाईल बंद येत होता. त्यामुळे नातेवाईकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले. विविध ठिकाणी शोध घेतल्यानंतर बांदा बसस्थानक परिसरात चौकशी केली असता काही स्थानिकांनी संबंधित व्यक्ती व मुलगी यांना पाहिल्याचे सांगितले.

दरम्यान, बसस्थानकाजवळच त्यांची हिरो होंडा मोटारसायकल आढळून आली. गाडीवर चावी तसेच रेनकोटची पिशवीही होती. त्यानंतर परिसरात तसेच नातेवाईकांकडे दोघांचा शोध घेण्यात आला. मात्र, ही शोधमोहीम अपयशी ठरली. लाडोबा लवू कदम यांची उंची ५ फुट ४ इंच, सावळा वर्ण, अंगाने मजबूत, काळे केस, मिशी ठेवलेली, फ्रेंचकट दाढी, अंगात पांढऱ्या रंगाचा टी-शर्ट व पॅन्ट आणि निहालिका हिची उंची सुमारे ३ फुट, सावळा वर्ण, सरळ बॉबकट केस, अंगात ऑरेंज रंगाचे जॅकेट घातलेले आहे. हे दोघे कोठेही आढळल्यास पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.