
देवगड : देवगड-जामसंडे नगरपंचायत क्षेत्रातील डासांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तसेच डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया यांसारख्या डासजन्य आजारांपासून नागरिकांचे संरक्षण करण्यासाठी नगरपंचायतीस तीन फॉगिंग मशीन उपलब्ध करून द्यावीत, अशी मागणी स्वच्छता, वैद्यक व सार्वजनिक आरोग्य समितीचे सभापती निवृत्ती उर्फ बुवा तारी यांनी मत्स्य व बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडे केली आहे.
देवगड-जामसंडे नगरपंचायतीचे कार्यक्षेत्र सुमारे ३१ चौरस किलोमीटर असून, नगरपंचायत क्षेत्रात एकूण १७ प्रभाग आहेत. नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने डास उत्पत्ती नियंत्रणासाठी नगरपंचायतीमार्फत नियमितपणे फॉगिंगची कार्यवाही केली जाते. सध्या गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर विविध ठिकाणांहून नागरिक मोठ्या संख्येने शहरात दाखल झाले आहेत. त्यामुळे सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने डास नियंत्रणाच्या उपाययोजना अधिक प्रभावीपणे राबविणे आवश्यक झाले आहे.
पावसाळ्यात तसेच पावसाळ्यानंतरच्या कालावधीत डासांची उत्पत्ती वाढत असल्याने डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया यांसारख्या आजारांचा धोका वाढतो. त्यामुळे नगरपंचायत क्षेत्रातील विविध भागांमध्ये नियमित आणि प्रभावीपणे फॉगिंग करणे गरजेचे आहे. मात्र, सध्या उपलब्ध असलेल्या फॉगिंग यंत्रसामग्रीच्या मर्यादेमुळे संपूर्ण नगरपंचायत क्षेत्रात आवश्यक त्या वारंवारतेने फॉगिंग करणे अडचणीचे ठरत आहे.
या पार्श्वभूमीवर जिल्हा नियोजन व विकास समिती (DPDC) अंतर्गत देवगड-जामसंडे नगरपंचायतीस तीन फॉगिंग मशीन खरेदी करण्यासाठी आवश्यक निधी मंजूर करून द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. फॉगिंग मशीन उपलब्ध झाल्यास नगरपंचायत क्षेत्रातील सर्व १७ प्रभागांमध्ये डास नियंत्रणाची कार्यवाही अधिक प्रभावीपणे व नियमितपणे करता येणार आहे.
यामुळे नागरिकांचे आरोग्य सुरक्षित ठेवण्यास तसेच डासजन्य आजारांचा प्रादुर्भाव रोखण्यास मदत होणार आहे. त्यामुळे जिल्हा नियोजन व विकास समिती (DPDC) अंतर्गत तीन फॉगिंग मशीन खरेदीसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यास मान्यता द्यावी, अशी विनंती सभापती निवृत्ती उर्फ बुवा तारी यांनी केली आहे.
ताजी बातमी
View all












