
बांदा : निगुडे गावातील गणपतींचे विसर्जन ज्या गणेशकोंड येथे पिढ्यानपिढ्या केले जाते, त्या ठिकाणी यंदा मात्र पाण्याची गंभीर कमतरता जाणवली. वर्षभर पाणी वाहत असलेल्या या पारंपरिक विसर्जनस्थळी यंदा पाणी पूर्णपणे आटल्याचे चित्र पाचव्या दिवशीच्या गणेश विसर्जनावेळी पाहायला मिळाले.
दरवर्षी गणेशमूर्ती विसर्जनावेळी मूर्ती पूर्णपणे पाण्यात बुडते. मात्र यंदा परिस्थिती वेगळी होती. मूर्तीच्या केवळ पायाला आणि पेडीलाच पाणी लागले, त्यामुळे ग्रामस्थांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
गणेशकोंडातील ही परिस्थिती भविष्यातील पाणीटंचाईचा संकेत ठरू शकते, अशी चिंता अनेक ग्रामस्थांनी व्यक्त केली. त्यामुळे प्रशासनाने या पारंपरिक जलस्रोताकडे गांभीर्याने लक्ष देऊन कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची गरज असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
या ठिकाणी आवश्यक ती कामे करण्यासाठी ग्रामस्थांनी श्रमदानाची तयारीही दर्शवली आहे. मात्र, कोणतीही उपाययोजना करताना परिसरातील नैसर्गिक रचनेला किंवा पर्यावरणाला हानी पोहोचणार नाही, याची काळजी घेतली जाईल, असेही ग्रामस्थांनी स्पष्ट केले.
दरम्यान, ग्रामस्थ सुधाकर राणे यांनीही या कामासाठी गरज पडल्यास यासाठी देणगी गोळा करण्याचं मत व्यक्त केलं व मदत करण्याची तयारी दर्शवली. सर्वांशी सल्लामसलत करून सर्वांच्या सहकार्याने एक चांगला तोडगा निघू शकतो असही राणे यांनी सांगितलं.
पिढ्यानपिढ्या गावाच्या धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरेशी जोडलेल्या या ठिकाणचेअस्तित्व आणि जलसाठा टिकवण्यासाठी प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी आता ग्रामस्थांकडून होत आहे.
ताजी बातमी
View all












