LIVE UPDATES

जिल्हा माहिती अधिकारीपदाची धुरा सचिन अडसूळ यांच्या हाती

मुकुंद चिलवंत यांची अहिल्यानगर येथे बदली
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: July 22, 2026 18:20 PM
views 40  views

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्गचे जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत यांची अहिल्यानगर येथे बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी कोल्हापूर येथील माहिती अधिकारी सचिन अडसूळ यांची सिंधुदुर्ग जिल्हा माहिती अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने गट 'अ' व गट 'ब' संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश बुधवारी (२२ जुलै) जारी केले.

मुकुंद चिलवंत यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात माहिती अधिकारी म्हणून १९ जुलै २०२३ रोजी रुजू झाले होते. त्यांनी तीन वर्षे आणि तीन दिवस सेवा बजावताना आपल्या कार्याचा वेगळा ठसा उमटवला. शासनाच्या विविध जनकल्याणकारी योजना, उपक्रम आणि धोरणांची माहिती प्रभावीपणे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. जिल्ह्यातील प्रसारमाध्यमांशी समन्वय राखत त्यांनी माहिती विभागाचे काम अधिक गतिमान आणि लोकाभिमुख करण्यावर भर दिला. त्यामुळे पत्रकार, विविध शासकीय विभाग तसेच सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींशी त्यांनी जिव्हाळ्याचे संबंध निर्माण केले.

दरम्यान, कोल्हापूर येथून बदली होऊन येत असलेले सचिन अडसूळ हे आता सिंधुदुर्ग जिल्हा माहिती अधिकारी म्हणून पदभार स्वीकारणार आहेत.