LIVE UPDATES

स्व. अजित पवार यांच्या स्मृतीप्रित्यर्थ विशेष आरोग्य शिबिराचा शुभारंभ

Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: July 22, 2026 21:18 PM
views 31  views

सिंधुदुर्ग : स्व. अजित पवार यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित करण्यात आलेल्या या विशेष आरोग्य शिबिरामुळे जिल्ह्यातील रुग्णांना दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध होणार आहेत. हे शिबिर महाराष्ट्र शासनाचा अत्यंत महत्त्वाकांक्षी उपक्रम आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, सिंधुदुर्ग येथील विविध कामे प्रगतीपथावर आहेत. जिल्ह्यतील रुग्णाला अधिक दर्जेदार  सेवा उपलब्ध करुन देणे आवश्यक असून भविष्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोणत्याही रुग्णाला उपचारासाठी इतरत्र रेफर करण्याची वेळ येऊ नये, यासाठी अधिष्ठाता व जिल्हा शल्यचिकित्सक यांनी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात करण्याचे निर्देश आमदार दिपक केसरकर यांनी दिले.

सर्वसामान्य नागरिकांना दर्जेदार, सुलभ आणि अत्याधुनिक आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या विशेष आरोग्य शिबिर अभियानाचा शुभारंभ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, सिंधुदुर्ग येथे आमदार दीपक केसरकर यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. स्वर्गीय अजित पवार यांच्या स्मृतीप्रित्यर्थ तसेच त्यांच्या जयंतीनिमित्त आयोजित या आरोग्य अभियानाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

 कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर स्वर्गीय अजित पवार यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अनंत डवंगे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील, जिल्हाप्रमुख प्रभाकर सावंत, आबिद नाईक तसेच वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना अधिष्ठाता डॉ. अनंत डवंगे यांनी विशेष आरोग्य शिबिर अभियानाची माहिती दिली. या अभियानांतर्गत नागरिकांसाठी विविध आरोग्य तपासण्या व उपचार सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यामध्ये रक्तदान शिबिर, स्तन कर्करोग तपासणी, गर्भाशय व मुख कर्करोग तपासणी, बोन मिनरल डेन्सिटी (BMD) तपासणी, नेत्र तपासणी तसेच आवश्यक शस्त्रक्रिया यांचा समावेश असल्याचे त्यांनी सांगितले. या शिबिरामध्ये तज्ज्ञ डॉक्टरांकडून रुग्णांची तपासणी करण्यात येणार असून आवश्यकतेनुसार पुढील उपचार व शस्त्रक्रिया शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयामार्फत करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी आबिद नाईक यांनी स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या सामाजिक कार्याचा आणि जनसेवेप्रती असलेल्या योगदानाचा गौरवपूर्ण उल्लेख केला. सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरांचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

प्रभाकर सावंत यांनी आपल्या मनोगतातून विशेष आरोग्य शिबिराचे महत्त्व अधोरेखित केले. नागरिकांनी या माध्यमातून दर्जेदार उपचार व आरोग्य सुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. तसेच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाच्या शेवटी समाजसेवा अधीक्षक (वैद्यकीय) नितीन तुरनर यांनी उपस्थितांचे आभार मानले.