
दोडामार्ग : माटणे येथील वजन काट्याजवळ दोन दुचाकींची समोरासमोर धडक बसून अपघात झाला. या अपघाताची भीषणता इतकी तीव्र होती की दुचाकीस्वार दीपक हरमलकर (45, मये, डिचोली गोवा) जागीच ठार झाला. तर रामा सुरेश गवस (२५, वझरे) हा बेशुद्ध झाला आहे. उर्वरित गणू उसपकर व जयराम शिरोडकर हे गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात बुधवारी सायंकाळी ४:४५ वाजण्याच्या सुमारास घडला.
याबाबत अधिक माहिती अशिकी मयेतील दीपक कुंभार हा त्याची एक्टिवा घेऊन दोडामार्गहून आयीच्या दिशेने जात होता. सोबत गणू उसपकर हे एक्टिवाच्या मागे बसले होते. तर रामा गवस हा त्याची स्पोर्ट दुचाकी घेऊन आयीहून दोडामार्गच्या दिशेने येत होता. रामा सोबत जयराम शिरोडकर होते. माटणे येथील वजन काट्याजवळ दोन्ही दुचाकींची समोरासमोर धडक बसली. ही धडक इतकी जबरदस्त होती की एक्टिवा दूरवर फेकली गेली रामा गवस याची दुचाकी तब्बल ५० ते ६० मीटर फरफटत गेली. दोन्ही दुचाकींवरील चौघेही रस्त्यावर फेकले गेले.
दीपक कुंभार याचे डोके रस्त्यावर आदळल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला. तर इतर तिघेजण सुद्धा गंभीर जखमी झाले. यावेळी मार्गस्थ होणाऱ्यांनी मदतीसाठी धाव घेतली. १०८ नंबर डायल करून रुग्णवाहिकेला पाचरण केले. दरम्यान अपघाताची माहिती मिळताच जि.प. सदस्य दीपक गवस, पं.स. सदस्य संजय सातार्डेकर, समीर रेडकर, पिकी कवठणकर, अतुल मळीक, ओमकार रेडकर हे घटनास्थळी दाखल झाले. अपघातग्रस्तांना रुग्णवाहिकेतून येथील ग्रामीण रुग्णालय दाखल करण्यात आले. मात्र दीपक कुंभार याचा जागीच मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केले.
स्पोर्ट दुचाकी चालक रामा गवस हा बेशुद्ध झाला असून गणू उसपकर यांचे हातपाय फ्रॅक्चर झाले आहेत. तिघाही जखमींना तात्काळ गोवा अजिलो येथे अधिक उपचारासाठी पाठवण्यात आले आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक हेमचंद्र खोपडे व त्यांची टीम तात्काळ घटनास्थळी दाखल झाली. त्यांनी रीतसर पंचनामा केला. मयत दीपक हरमलकर हा वझरे येथील एका कंपनीत कामाला आहे, अशी माहिती समोर आली आहे. तो नेहमी मयेतून कामावर ये-जा करायचा. दरम्यान, मयेचे आमदार प्रेमेंद्र शेट यांनी रुग्णालयात मृत युवकाच्या कुटुंबीयांची भेट घेतली.










