
देवगड : दिल्ली येथील जंतर मंतरवरील आंदाेलनात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जच्या विराेधात निषेध व्यक्त करण्यासाठी देवगड तालुका महाविकास आघाडीच्यावतीने 23 जुलै राेजी सकाळी 10.30 वा. देवगड तहसिल कार्यालयासमाेर धरणे आंदाेलन करण्यात येणार आहेत अशी माहिती ठाकरे युवासेनेचे तालुकाप्रमुख गणेश गावकर आणि काँग्रेस युवक जिल्हाध्यक्ष किरण टेंबुलकर यांनी देवगड येथील शासकीय विश्रामगृह येथे आयाेजित महाविकास आघाडीच्या संयुक्त पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी मनसे तालुकाप्रमुख संताेष मयेकर, महिला उपतालुकाप्रमुख स्वाती सावंत, काँग्रेसचे सजाउद्दीन साेलकर आदी उपस्थित हाेते. गणेश गावकर म्हणाले, मागील काही दिवसांपासून नीट पेपरफुटीच्या विराेधात दिल्ली येथील जंतर मंतर वर साेनम वांगचुक आणि अभिजीत दीपके यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थी शांततापुर्ण आंदाेलन व उपाेषण करीत आहेत. मात्र हे आंदाेलन दडपण्याचा प्रयत्न करीत आहे. सुमारे 23 दिवस उपाेषण सुरू होते. आंदाेलनातील विद्यार्थ्यांवर पाेलिसांनी लाठीचार्ज केला. धरणे आंदाेलनात विद्यार्थ्यांसह देवगडवासियांनी सहभागी व्हावे असे आवाहन गावकर यांनी केले आहे.










