
वेंगुर्ला : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी, वेंगुर्ला, वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग, तुळस, हनुमान मित्र मंडळ (जुना स्टॅण्ड, वेंगुर्ला), छत्रपती मित्र मंडळ (कॅम्प-भटवाडी, वेंगुर्ला) तसेच राष्ट्रीय सेवा योजना व राष्ट्रीय छात्र सेना विभाग, बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालय, वेंगुर्ला यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेले भव्य रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न झाले. या शिबिरात ६७ रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडविले.
शिबिराची सुरुवात जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व प्रतिमा पूजनाने करण्यात आली. यावेळी व्यासपीठावर भाजपा तालुकाध्यक्ष पप्पू परब, नगराध्यक्ष राजन गिरप, उपनगराध्यक्ष सुहास गवडळकर, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना देसाई, पंचायत समिती सभापती शंकर घारे, पंचायत समिती सदस्य नितीन मांजरेकर व संकेत धुरी, संस्था प्रतिनिधी सुरेंद्र चव्हाण, तालुका सरचिटणीस वसंत तांडेल, राजबा सावंत, नगरसेवक प्रणव वायंगणकर, सचिन शेट्ये, रवींद्र शिरसाठ, प्रीतम सावंत, सुधीर पालयेकर, नगरसेविका सुषमा खानोलकर, आकांक्षा परब, गौरी मराठे, शितल आंगचेकर, काजल कुबल, वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग तुळसचे अध्यक्ष डॉ. सचिन परुळकर, सचिव विवेक तिरोडकर, साईप्रसाद नाईक, मनवेल फर्नांडिस, वृंदा गवडळकर, श्रेया मयेकर, नितीन चव्हाण, नितीन परब, सायमन आल्मेडा, मारुती दोडाशानट्टी, संतोष सावंत, श्रेयस परब, मनोहर तांडेल, दशरथ गडेकर, योगेश खानोलकर, राहुल गावडे, सत्यविजय गावडे, प्रकाश रेगे, नामदेव सरमळकर, महेश प्रभुखानोलकर, महेश राऊळ, अमेय धुरी, दादा केळुसकर तसेच भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग, तुळस यांचे सलग ४१ वे रक्तदान शिबिर ठरले. युवक, महिला, सामाजिक कार्यकर्ते तसेच विविध क्षेत्रातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत रक्तदान केले. रक्तदान शिबिराला नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभल्याने आयोजकांनी समाधान व्यक्त केले. यावेळी बोलताना जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी म्हणाले, "मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात विकासकामे, लोककल्याणकारी योजना आणि सर्वसामान्यांच्या हितासाठी सातत्याने कार्य केले आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदानासारखा समाजोपयोगी उपक्रम आयोजित करणे ही त्यांना शुभेच्छा देण्याची आणि त्यांच्या सामाजिक कार्याला सलाम करण्याची एक उत्तम पद्धत आहे. रक्तदान ही मानवतेची सर्वोच्च सेवा असून एका रक्तदात्यामुळे अनेकांना जीवनदान मिळू शकते. त्यामुळे प्रत्येक निरोगी व्यक्तीने नियमित रक्तदान करणे ही काळाची गरज आहे. सर्व आयोजक संस्थांनी सातत्याने राबविलेला हा उपक्रम समाजासाठी प्रेरणादायी आहे."
नगराध्यक्ष राजन गिरप यांनी आपल्या मनोगतात सांगितले, "मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करून आयोजकांनी आदर्श निर्माण केला आहे. रक्तदानामुळे अनेक गरजू रुग्णांना वेळेवर मदत मिळते. अशा उपक्रमांमधून समाजातील सेवाभाव अधिक दृढ होत असून युवकांनी मोठ्या प्रमाणात या चळवळीत सहभागी व्हावे." याप्रसंगी बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. धनराज गोस्वामी यांनी शुभेच्छा संदेश पाठवून उपक्रमाच्या यशस्वितेसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.
रक्तदान चळवळीच्या माध्यमातून गरजू रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध करून देण्यासाठी अनेक संस्था प्रयत्नशील असून या शिबिराद्वारेही समाजाप्रती आपली बांधिलकी अधोरेखित करण्यात आली. रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी सर्व आयोजक संस्था, स्वयंसेवक, वैद्यकीय पथक तसेच रक्तदाते यांनी विशेष परिश्रम घेतले. "रक्तदान हेच श्रेष्ठ दान – जीवनदानाचा महान संकल्प" हा संदेश प्रत्यक्ष कृतीतून साकार करत पार पडलेल्या या उपक्रमाबद्दल आयोजकांनी सर्व रक्तदाते, सहकार्य करणाऱ्या संस्था व उपस्थित मान्यवरांचे आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.सचिन परुळकर यांनी तर आभार डॉ गोविंद धुरी यांनी मानले.










