शेतकऱ्यांनो तुमच्यासाठी महत्वाचं ; ई - पीक पाहणी नोंदणी थेट करा मोबाईल ॲपद्वारे

Edited by: विनायक गावस
Published on: July 01, 2023 12:35 PM
views 287  views

सावंतवाडी : आता इ-पीक पाहणी मोबाईल ॲपच्या सहाय्याने देखील होणार असून सर्व खातेदार शेतकऱ्यानी तलाठ्याकडे न जाता स्वतःच्या मोबाईलवरून आपल्या ७/१२ वर विविध पिकांची नोंदणी करता येणे शक्य झाले आहे. महसूल विभागाचा ई-पीक पाहणी प्रकल्प १५ ऑगस्ट २०२१ पासून महाराष्ट्रात राज्यभर राबविण्यात येत आहे. या ॲपमध्ये आतापर्यंत सुमारे १.८८ कोटीपेक्षा अधिक शेतकऱ्यानी रेजिस्ट्रेशन केलेले आहे व आपल्या पिकांची नोंदणी केली आहे.

खरीप हंगाम २०२३ पीक पाहणी नोंदणीसाठी ई – पीक पाहणीचे २.०.११ हे अपडेटेड व्हर्जन गूगल प्ले स्टोअर वर उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. तरी सर्व खातेदार शेतकऱ्यांनी नवीन व्हर्जन अपडेट करून घेणे आवश्यक आहे. खरीप हंगामाच्या प्रत्यक्ष ई-पीक पाहणी मोबाईल ॲपद्वारे पीक पाहणी करण्यासाठी ०१ जुलै २०२३ पासून सुरु करण्यात येत आहे.

तरी राज्यातील सर्व शेतकरी बंधु-भगिनीनी खरीप हंगाम २०२३ साठी दिलेल्या कालावधीमध्ये आपली ई – पीक पाहणी नोंदणी पूर्ण करावी जेणे करून शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यास अडचण येणार नाही, अशी माहिती सावंतवाडी तहसीलदार श्रीधर पाटील यांनी दिली.